Smart Meter Protest Pudhari
नाशिक

Smart Meter Protest | ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसविले स्मार्ट मीटर

Smart Meter Protest | आंदोलनाचा इशारा; महावितरण व ठेकेदारांवर बळजबरीचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहरात सध्या महावितरण व संबंधित ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जुने डिजिटल मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही कोणतीही पूर्वसूचना, लेखी परवानगी किंवा ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलले जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

अनेक भागांमध्ये वायरमन, ठेकेदार कर्मचारी व काही अधिकारी ग्राहकांना योग्य माहिती न देता किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, थेट मीटर बदलत असल्यामुळे नागरिकांनी या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिले अधिक येत असल्याची तक्रार केली आहे.

तसेच देयक भरण्यास थोडाही विलंब झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होत असल्यामुळे सामान्य कुटुंबांना, लहान व्यावसायिकांना, वृद्ध नागरिकांना व रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर अशीच बळजबरी राहिली, तर नागरिकांकडून आंदोलन, तक्रारी व कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविलेले स्मार्ट मीटर तत्काळ हटविण्यात यावेत. पूर्वीचे डिजिटल मीटर पुन्हा बसविण्यात यावेत. जबरदस्ती करणाऱ्या संबंधित अधिकारी, वायरमन व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे

अधिकारी, ठेकेदारांकडून विद्युत कायदा धाब्यावर

विद्युत कायदा २००३ अंतर्गत स्मार्ट मीटर हे सर्वसाधारणपणे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकार व केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केलेले आहे, असे असतानाही काही अधिकारी व ठेकेदार संगनमत करून बळजबरीने मीटर बसवित असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कलम ४७ (५) नुसार ग्राहकाला स्मार्ट प्रणाली स्वीकारायची की नाही हे निवडण्याचा अधिकार आहे.

महागाईचा भडका उडाला आहे. व्यवसायांवर मंदीचे सावट आहे. अशात ग्राहकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटर बसवणे ऐच्छिक आहे.
- मेहमूद दारूवाला, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT