मुसळधार पावसात सिन्नर बसस्थानकाचे छत काेसळले 
नाशिक

Nashik Rain : मुसळधार पावसात सिन्नर बसस्थानकाचे छत काेसळले

जिवितहानी टळली; शिवशाही बससह कारचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Nashik Rain

सिन्नर : सिन्नर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तालुक्यात रविवारी (दि.२५) दुपारी चारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या छताचा पुढचा भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका शिवशाहीसह कारवर या छताचा काही भाग काेसळल्याने बस व कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे प्रवाशी बसस्थानकाच्या आतील बाजूस उभे असल्याने माेठी दुर्घटना टळली. घटनेनंतर नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा, सिन्नर पाेलिसांचे पथक व एसटीचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. घटनेनंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून बसस्थानक रिकामे करण्यात आले.ठाणे आगाराची शिर्डी-ठाणे शिवशाही बस (क्र.एमएच. 09/इएम 3575) नुकतीच आगारात आली हाेती. या बसमध्ये जवळपास २७ प्रवाशी हाेते. त्यांना संकटकालीन मार्गातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अन्य बसने त्यांना ठाण्याकडे रवाना करण्यात आले.

दरम्यान, याच सुमारास कुटुंबातील प्रवाशांना सोडण्यासाठी एकजण कारने (क्र.एमएच 03. एडब्ल्यू/4348) घेऊन बसस्थानकात आला होता. मुसळधार पाऊस सुरु असल्याने चालकाने बसस्थानकाला लागून कार उभी केली होती. यादरम्यानच कारवर छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने चालकासह कारमधील प्रवाशी उतरुन बसस्थानकात गेले होते. त्यामुळे जिवितहानी टळली.पोलिस पथक व सिन्नर नक्षर परिषदेची अग्निशमन यंत्रणा, यांच्यासह विभाग नियंत्रक सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भाेसले, कल्याणी ढगे, आगारप्रमुख हेमंत नेरकर, स्थानकप्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, जयवंत चाेपडे व कर्मचारी आदींनी मदतकार्य केले.

बसस्थानकाबाहेर गर्दी अन् वाहतूक कोंडी

बसस्थानकाचा छताचा पुढचा भाग काेसळल्यानंतर मदतकार्य सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बसस्थानकात येणाऱ्या बसेस बसस्थानकाबाहेरच थांबवून परस्पर मार्गक्रमण करीत हाेत्या. त्यामुळे प्रवाशांची बसस्थानकाबाहेर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच बसेस रस्त्यातच थांबत असल्याने वाहतूक कोंडी झाली हाेती.

छतावर पाणी तुंबल्याने दुर्घटना?

दरम्यान, बसस्थानकाच्या छतावरुन पाणी वाहून जाण्यास पाईप टाकून व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, छतावरुन वाहून जाणाऱ्या वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्याने पाणी तुंबले असावे. गेली अनेक वर्षे याची देखभाल दुरुस्ती झाली नसावी. त्यामुळे पाणी साचून झिज झालेला छताचा पुढचा भाग वादळी वाèयासह झालेल्या पावसात काेसळला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येतआहे.

छतावर पाणी साचण्याचा प्रश्न येत नाही. ही दुर्घटना अतिवृष्टीमुळे झालेली आहे. या घटनेत एकही प्रवाशी जखमी झालेला नाही. प्रवाशी सुखरुप आहेत. शिवशाही बस व अल्टाे कारचे नुकसान झाले.
हेमंत नेरकर, आगार व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT