

दिंडोरी (नाशिक): तालुक्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ६०० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात कांदा, भुईमूग, मका, पुदिना, सिमला मिरची यांसह भाजीपाल्याचा समावेश आहे.
पावसामुळे फूलशेतीचेही मोठे नुकसान झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरू असून, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. सध्या बाजारात कांद्याला ७०० ते १००० रुपये सरासरी दर मिळत आहे.
गत काही वर्षामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढल्याने लागवडीखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. यावर्षी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. त्यामुळे दमट वातावरण असल्याने कांदा जमिनीमध्येच कुजत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा काढणीचा खर्चही निघेनासा झाला आहे.
अवकाळी पावसामुळे कांद्याचे भावही घसरले आहेत. एप्रिल महिन्यात १,३०० ते १,५०० रुपये बाजारभाव होते. मात्र, अवकाळी पावसामुळे कांद्याच्या बाजारभावातही घसरण झाली आहे. मिळणारा भाव कमी असल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्किल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा खराब होऊ लागल्याने, तसेच चाळीतील कांद्याची घट होऊ लागल्याने शेतकरी मिळेल त्या भावाने उन्हाळी कांदा विक्री करत आहेत.
यावर्षी चांगले भाव मिळतील, या अपेक्षेने कांद्याची लागवड केली होती. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून, हा बाजारभाव तोट्याचा ठरत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.
मनोज निकम, कांदा उत्पादक शेतकरी
तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खडक सुकेणे, पालखेड, खेडगाव, आबे दिंडोरी, जऊळके दिंडोरी आदी ठिकाणी गुलाब शेती केली जाते. तालुक्यात ७५ हेक्टर क्षेत्रावर गुलाब शेती केली जाते, तर १५ हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसमध्ये विविध प्रकारच्या गुलाबाची लागवड करून उत्पादन घेतले जात आहे. त्यासाठी एकरी ६० लाख रुपये खर्च येत आहे, तर उघड्यावरील गुलाबशेतीसाठी एकरी पाच लाख रुपये खर्च येतो. मात्र, अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे १० ते १२ पॉलिहाउस जमीनदोस्त झाले तर काहींचा प्लास्टिक कागद फाटल्याने मोठे नुकसान झाले आहे.