नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पर्वण्यांच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि.1) रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत 13 आखाड्याच्या प्रतिनिधिंची बैठक होत आहे. यानिमित्ताने जिल्हो प्रशासनाने तयार पूर्ण केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान साधू महंत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या पर्वण्यांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून साधू-महंतांकडून सिंहस्थ परवण्यांच्या तारखा जाहीर करण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात 20 फेब्रुवारी रोजी प्रशासनाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सिंहस्थ कामाचा आढावाही घेण्यात आला होता. दरम्यान, गत चार महिन्यापासून दर आठवड्याला सिंहस्थ संदर्भात विभागीय आयुक्त प्रविण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहेत.
जिल्हा प्रशासनाने साधुमहंतांच्या मागण्या यापूर्वीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यानंतर सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आजच्या बैठकीत याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीला विविध आखाडा परिषदेचे 26 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबक येथील एकूण 10 शैव आखाड्यांचे 20 प्रतिनिधी आणि 3 वैष्णव आखाड्यांचे 6 असे एकूण 26 प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. यात भा. आखाडा परिषदेचे पंचायती श्री निर्वाणी आराखडा, श्री निर्मोही आखाडा, श्री दिंगबर आखाडा, श्री जुना आखाडा, श्री आवाहन आखाडा, श्री अग्नी आखाडा, श्री निरंजनी आखाडा, श्री आनंद आखाडा, श्री महानिर्वाणी आखाडा, श्री अटल आखाडा, श्री बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा, श्री निर्मल आखाडा या आखाड्यांना निमंत्रण देण्यात आले असून, प्रत्येकी दोन सदस्य उपस्थित राहणार आहेत.