सिंहस्थ कुंभमेळा नियोजनावर साधू- महंतांची नाराजी pudhari photo
नाशिक

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा नियोजनावर साधू- महंतांची नाराजी

बैठका, भेटीगाठींचा फार्स थांबवा; प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपलेला असताना, शासनस्तरावर उदासीनता दिसून येत आहे. अधिकार्‍यांनी भेटीगाठी आणि बैठकांचा फार्स थांबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी तसेच कुंभमेळा अयशस्वी झाल्यास त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा संतप्त सवाल त्र्यंबकेश्वर येथील साधू- महंतांनी उपस्थित केला आहे.

येथील महानिर्वाणी आखाड्यात आराध्य दैवत कपील महामुनी जयंती उत्सवानिमित्त शनिवारी (दि. 13) एकत्र आलेल्या साधू - महंतांनी याबाबत परखड शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.

आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी शासनाकडे कुंभमेळा करण्यासाठी पैसे नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे सांगत, कुंभमेळ्याबाबत शासन अशा प्रकारे धरसोड करत केवळ बैठका आणि भेटीगाठीचे फार्स करत असेल, तर कुंभमेळ्यात फजिती होईल. त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल अशा शब्दांत सरस्वती यांनी रोष व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर येथे 10 आखाडे आहेत. त्यातील 7 नागा साधूंचे आहेत. मात्र, त्र्यंबक नियोजनाबाबत दुर्लक्ष आहे. येथे असलेल्या भौगोलिक मर्यादा पाहता नियोजनास वेळ मिळणार नाही हे वेळोवेळी निदर्शनास आणूनदेखील उपयोग झालेला नाही असे मत यावेळी साधूंनी व्यक्त केले.

महानिर्वाणी आखाड्याचे सचिव महंत रमेशगिरी महाराज यांनी अमृतस्नान कुशावर्तावर होईल याचा पुनरुच्चार केला. कुंभमेळ्याची प्राचीन परंपरा कुशावर्तावर आहे. साधू- महंत आणि भक्त हेदेखील कुशावर्तावर स्नान करतील. अमृतस्नानावेळी नागा साधूंचे स्नान आटोपल्यानंतर वैष्णव आखाड्यांसाठी राखीव असतो. मात्र, वैष्णव आखाडे नाशिक येथे स्नान करतात. तो मोकळा वेळ भक्तांना स्नानासाठी उपलब्ध करून दिल्यास गर्दीचे नियंत्रण होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी आ. हिरामण खोसकर यांनी नियोजनाबाबत अधिकारी विचारात घेत नसल्याची तीव्र खंत व्यक्त केली. चक्रतीर्थ चाकोरे, कावनई यासह तीर्थस्थळांवर भक्तांची गर्दी वाढणार आहे. त्यांच्यासाठी रस्ते, निवारा, स्वच्छतागृह अशा सुविधा उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

महानिर्वाणी आखाड्याचे सचिव महंत शिवनारायण पुरी महाराज यांनी आखाड्याचे आराध्य देवता कपील महामुनी यांच्याबाबत महिती दिली. यावेळी 10 आखाडे व आश्रमांचे साधू- महंत, पंडित रतीश दशपुत्रे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT