

लासलगाव: येथील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली असून, त्याला किमान 400 रुपये, कमाल 901 रुपये, तर सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा शहरी भागामध्ये विक्री करता उपलब्ध झाल्याने कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. मागील महिन्यात सरासरी 1,800 रुपये क्विंटलने विक्री झालेला उन्हाळ कांदा सध्या 1,100 रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे.
मिळणार्या दरातून उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या हंगामात कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने त्या तुलनेत कांद्याचा निकस कमी प्रमाणात होत आहे.
कांदा निर्यातीमध्येही अनेक अडथळे येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक अशी स्थिती आहे. त्यात नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा किरकोळ बाजारामध्ये विक्रीसाठी येत असल्याने दरात सातत्याने घसरण सुरू आहे. त्यात आता नवीन लाल कांद्याची आवकही सुरू झाल्याने बाजार भाव आणखी घसरण्याची भीती आहे.
येथील बाजार समितीमध्ये 397 वाहनांतून 5,840 क्विंटल उन्हाळ कांदा आवक होऊन किमान 500 कमाल 1,600 रुपये, तर सरासरी 1,151 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.