नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधुग्रामसाठी भूसंपादन प्रक्रियेला महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी वेग दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारणी व इतर आवश्यक ठिकाणी करावयांच्या भूसंपादनासाठी सर्व प्रस्तावांना प्राधान्यक्रम समितीची मान्यता घेऊन तातडीने संपादन कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश आयुक्त खत्री यांनी नगरनियोजन व भूसंपादन विभागाला दिले आहेत.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थासाठी सुमारे पाच लाख साधु-महंत व पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या साधु-महंत व भाविकांना महापालिकेच्या माध्यमातून मुलभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. साधु-महंतांच्या आखाड्यांसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. साधुग्राम भूसंपादनासाठी सध्या प्रशासनापुढे संबंधित जागा कायमस्वरूपी संपादित करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर जमीन अधिग्रहण करणे असे दोनच प्रस्ताव आहेत. परंतु, महापालिकेकडे भूसंपादनासाठी निधी नसल्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पाच प्रकारचे फॉर्मुले तयार करण्यात आले असून शासनाला सादर करण्यात आले आहेत. शासनाकडून भूसंपादनाच्या फॉर्म्युल्यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. साधुग्राम खेरीज अन्य सिंहस्थ कामांसाठीदेखील भूसंपादनाची आवश्यकता आहे. सिंहस्थासाठी आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी सिंहस्थासंबंधित सर्व प्रस्तावांना तातडीने प्राधान्यक्रम समितीची मंजूरी घेऊन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने साधुग्रामसाठी सुमारे एक हजार एकर जागेची आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत तपोवनातील ९३ एकर जागा महापालिकेते संपादित केलेली असून २८३ एकर जागेचे संपादन करणे आवश्यक आहे. उर्वरित जागा भाडेपट्ट्यावर घेण्याचा महापालिकेचा विचार आहे.