नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात नाशिक शहरातील ९३० कोटींच्या २१ रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात केवळ २९८.५५ कोटींच्याच रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे मार्च २०२७ पर्यंत पुर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सिंहस्थ आराखड्यांतर्गत महापालिकेने २०६८ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी मागितली होती. त्यापैकी आतापर्यंत एकूण १२२८ कोटींच्या रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी मिळू शकली असून उर्वरित ८४० कोटींच्या रस्ते कामांवर प्राधिकरणाकडून फुली मारण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. सिंहस्थासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सिंहस्थ कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या ५७५६ कोटींच्या सिंहस्थ कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील ६१ रस्त्यांची यादी सादर करत या रस्त्यांसाठी २०६८ कोटींची मागणी केली होती. कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या निर्देशांनुसार महापालिकेने या रस्त्यांचा प्राधान्यक्रम पोलिसांकडून ठरवून घेतला. सिंहस्थासाठी अ,ब,क अशी ६१ रस्त्यांची तीन टप्प्यात वर्गवारी करत, अंतिम मंजूरीसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला सादर केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात २१ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देत ९३० कोटींना मंजूरी दिली होती. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी दुसऱ्या टप्प्यात ९ रस्त्यांसाठी २९८.५५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
८४० कोटींच्या कामांवर फुली?
सिहंस्थासाठी प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात २१ रस्त्यांच्या कामांसाठी ९३० कोटी २३ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी दिली होती. त्यानंतर ९ रस्त्यांसाठी २९८.५५ कोटींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत सिंहस्थ रस्त्यासाठी महापालिकेकरीता १२२८.७८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित ८४० कोटींच्या रस्ते कामांवर प्राधिकरणाने फुली मारल्याची चर्चा आहे.
क्लब टेंडरच्या आरोपानुसार सुधारणा
९३० कोटींच्या रस्ते कामांमध्ये क्लब टेंडरींग झाल्याच्या आरोपांनंतर प्राधिकरणाने १२९ कोटींच्या एक रस्त्याचे क्लब टेंडरीग करतांनाच, उर्वरीत आठ रस्त्यांची कामे स्थानिक आणि छोट्या ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ रस्त्यांपैकी चार रस्त्याचे क्रॉक्रींटीकरण, एक रस्त्याचे व्हाईट टॅपिंग तर उर्वरीत चार रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. मार्च २०२७ पर्यंत रस्ते कामे पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मंजूर रस्ते
नाशिकरोड मालधक्का रोड व रेल्वेस्टेशन जोडरस्ते विकसीत करणे (क्रॉंक्रींटीकरण ) १०.०५ कोटी
नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सत्कार पॉईंट रस्ता (क्रॉंक्रीटकरण)- ११.६५ कोटी
अमृत मिरवणूक मार्ग विकसीत करणे ( क्रॉंक्रीटकरण ) - २५ कोटी
मुंबई नाका ते त्र्यंबक नाका रस्ता विकसीत करणे ( व्हाईट टॅपिंग ) - १४.४३ कोटी
चांदशी पूल ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कल ते सिटीसेंटर मॉल पूल पर्यंतचा रस्ता विकसीत करणे ( डांबरीकरण) - ५९.५९ कोटी
सिटी सेंटर मॉल पूल ते इंदीरानगर अंडर पास पोवेतो रस्ता विकसीत करणे ( डांबरीकरण) - १३.१९ कोटी
टाकळी मलनिस्सारण केंदर ते आरटीओ कार्यालय पेठ रोड,मखमलाबाबत रोड पोवेतो रस्ता विकसीत करणे ( क्रॉंक्रीटीकरण ) - १२९.२३ कोटी
पिंपळगाव खांब फाटा ते वडनेर गेट पोवतोचा रस्ता विकसीत करणे ( डांबरीकरण) - १८ कोटी
नाशिक पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव ते पिंपळगाव खांब पर्यता रस्ता विकसीत करणे (डांबरीकरण) १७.४१ कोटी