नाशिक : ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा या पवित्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. एकच वर्ष असल्याने जलद गतीने कामे करावी लागणार आहेत. भूसंपादनाला वेग द्यावा लागणार आहे. त्यासाठी 'मॅन पावॅर' वाढवा, कामे मार्गी लावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकला जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा ठरेल, असेही ते म्हणाले.
ठक्कर डोम मैदान येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सिंहस्थांची उत्तम तयारी सुरू आहे. राज्य सरकार आधीपासूनच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या कामाला लागले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या असून, त्यात तात्पुरत्या व दीर्घकाळ कामांसाठीच्या सूचना दिल्या आहेत. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-त्र्यंबकला लाखो संत, महात्मे येणार आहेत. या सर्वांची व्यवस्था दर्जेदार असावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. याशिवाय सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवली जाणार आहे. त्यासाठी प्रशासन आणि शासन अत्यंत उत्तम पद्धतीने काम करीत आहे. नियोजनात सर्वांचाच कस लागणार आहे. मात्र, लाखो लोकांच्या सुरक्षेचा हा विषय असल्याने, त्यात कुठलीही त्रुटी ठेवली जाणार नाही. सिंहस्थ कुंभमेळा प्रशासनाची परीक्षा असेल. त्यात आपण उत्तीर्ण होऊ, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तसेच गोदावरीला प्रेमाने गंगाच म्हटले जाते. गंगेइतकेच पावित्र्य गोदावरीचे आहे. त्यामुळे ते जपण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. साधू-महंतांच्या आखड्यांशी आपण चर्चा करीत असून, नदीपात्रातील स्वच्छतेवर कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली असून, टीम वर्कने ही सर्व कामे मार्गी लावावी लागणार आहेत. कायदा-सुव्यस्थेत कठोरपणे कामे करणारे अधिकारी असून, हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
अफवांवर 'डिजिटल कुंभ' प्रभावी
साधुग्राम, स्वच्छता व्यवस्था, रामकुंड आणि कुशावर्तचे पावित्र्य आदी सर्व बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात नकारात्मक बातम्या तसेच खोट्या अफवांवर 'डिजिटल कुंभ' ही संकल्पना प्रभावी ठरेल. कुंभमेळ्यात एआयचादेखील वापर खुबीने केला जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.