नाशिक : पेशवा शासनकाळात सिंहस्थासाठी भुमी आरक्षित करण्यात आली होती. मात्र गत दोन सिंहस्थापासून तपोवन ते गोदाकाठ अतिक्रमण वाढत गेल्याने साधुग्रामसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.
सिंहस्थ काळात संपूर्ण भारतवर्षातून लाखो साधुमहंत नाशिकमध्ये येणार असल्याने साधुग्रामसाठी सुमारे 1500 एकर भुमी आरक्षित करण्यात यावी, मागील कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता तो पाळावा, अशी मागणी तीनही वैष्णव आखाड्यांनी केली आहे.
सिंहस्थ कुंभपर्वच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये येत असल्याने बैठकीच्या पुर्वसंध्येला निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाडा या तीन वैष्णव आखाड्यांच्या साधुमहंतांनी तपोवनातील मकवाना सदनमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साधुमहंतांनी ही मागणी केली. यावेळी निर्मोही आखाड्याचे राजेंद्रदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महाराज, खाकी आखाड्याचे मोहनदासजी महाराज, भानुदास महाराज (अयोध्या), श्यामसुुंदरदास महाराज (डाकोर), पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज यांच्यासह साधुमहंत उपस्थित होते.
यावेळी निर्मोही आखाड्याचे राजेंद्रदास महाराज म्हणाले की, नाशिक शहरातील प्रत्येक घाटरोड, चौक, गेट यांना साधुमहंतांची नावे द्यायला हवी. मागील कुंभमेळ्यात आरक्षित जमिनीचा मोबदला अद्यापही शेतकर्यांना मिळालेला नाही तो द्यायला हवा. वैष्णव आखाड्यांसाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित व्हावी, मठमंदिरांची डागडुजी व्हायला हवी. भारतीय परंपरा चिन्हीत व्हायला हव्यात. अतिक्रमण वाढल्याने भुमीचे आरक्षण धक्का खात खात हायवेपासून गोदाकाठापर्यंत आले. हे अतिक्रमण तत्काळ हटवायला हवे. 1994 मध्ये साधुंचे 84 खालसे होते 2025 मध्ये 1500 खालसे आहेत. साधुंची संख्या वाढत असल्याने साधुंसाठी वेगळी तर सेवा देण्यासाठी येणार्या संस्थांना वेगळी जागा द्यावी, अशी मागणी यावेळी निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज यांनी केली.
शाही हा शब्द मुघल संस्कृतीतला असल्याने शाही हा शब्द सिंहस्थ कामकाजासंदर्भात शासकीय कागदपत्रांमधून तत्काळ हटविण्यात यावा अन् अमृतस्नान असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी साधुमहंतांनी केली. पुरातन काळात देवांचा राजा इंद्र यांचा मुलगा जयंत याने समुद्रमंथनातून निघालेला अमृतकुंभ देवांकडे सोपविण्यासाठी नेताना तो नाशिक येथे ठेवला. त्यातील काही अमृताचे थेंब येथील तीर्थात पडल्याने येथे सिंहस्थ कुंभ सुरू झाला. म्हणून स्नानाला अमृतस्नान असे नाव देण्यात यावे, अशी मागणी यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केली.
सिंहस्थ कुंभच्या तारखा अगोदर पुरोहित संघाकडून काढण्यात येतात. यावर आखाड्यांमध्ये चर्चा केली जाते. यानंतर चतु:संप्रदाय आखाड्यांकडून तारखांना मंजुरी घेतली जाते त्यानंतर प्रयागराज येथे तारखा निश्चित करण्यात येतात अशी माहिती यावेळी महंत राजेंद्रदास यांनी दिली.