नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधु-महंत व भाविकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार असून त्यासाठी रमणी आयोगाच्या सूचनांची पुरेपूर अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी 'झिरो आऊट ब्रेक डिसीस'ला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
आयुक्त शेखर सिंह यांनी गुरूवारी(दि.३०) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शेखर सिंह म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या देखरेखाली कुंभमेळ्याचे कामे पूर्णत्वास नेले जाणार आहे. कमी वेळात जास्त कामे मार्गी लावावी लागणार असली तरी सर्व कामांची गुणवत्ता राखली जाईल, त्रयस्थ संस्थेमार्फत सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सिंहस्थासाठी २५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. कुंभमेळ्यात ८ ते १० कोटीच्या आसपास भाविक येणार असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीन कामाचे नियोजनाचे सुरु आहे. गेल्या काही दिवसात अनेक कामांचे टेंडर निघाले, काही सुरु झाले तर काही येत्या काही दिवसात सुरु होतील. पण, ही सर्व कामे मुदतीतच पूर्ण होतील. सुरक्षित कुंभमेळ्यासाठी यंदा डिजिटीलायझेशनवर भर दिला जात आहे. ८ ते ९ कोटी भाविक कुंभमेळ्यास येण्याचा अंदाज असून त्यांची सुरक्षितता जपणे मोठे आव्हान राहणार आहे. ही एक तारेवरची कसरत असून गर्दीचे अचुक नियोजन आम्ही करीत आहोत. या कामात स्थानिक नागरिक, सामाजिक, आद्योगिक आणि बांधकाम संघटनांना देखील सहभागी करून घेणार आहोत, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.
साधुग्रामसाठी भूसंपादन
साधुग्रामसाठी नाशिकमधील साधुग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच २७७ एकर जागा कायमस्वरूपी संपादीत करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर साधुग्रामसाठी २१२ एकर जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
या कामांकडे वेधले लक्ष
कुंभमेळा माध्यमातून नाशिक अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याचा प्रयत्न
मनपा एसटीपी प्रकल्पाचे काम सुरु
मार्च २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करणार
ड्रेनेज, सीसीटीव्ही, सांडपाणी सर्व कामे एकत्रित करणार
रमणी आयोगाच्या बहुतांश सूचनांचा नियोजनात समावेश
नाशिकमध्ये ३७७ एकर जागेचे भूसंपादन केले जाणार (९४ एकर भूसंपादन पूर्ण)
नाशिक साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा देण्याचा प्रयत्न
त्र्यंबकेश्वरमध्ये दोन कि.मी घाट निर्मिती
रिंग रोड करण्याचा विचार
नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये श्वरमध्ये ६ पदरी रोड करण्यास कोणतीही अडचण नाही
पर्यटनास चालना देण्यासाठी जिल्ह्यात टेन्ट सिटी उभारणार (६ ठिकाणे निश्चित )
त्र्यंबक दर्शन पथ तयार होणार
गर्दी नियोजन, आपत्तीची व्यवस्थापन आणि संकट व्यवस्थापनावर भर देणार