नाशिक : रस्ते दुरुस्तीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या पाच मक्तेदारांना पुनश्च नोटिसा बजावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील रस्ते तातडीने दुरूस्त करण्याचे आदेश देताना कामात सुधारणा न झाल्यास सिंहस्थ कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मज्जाव केला जाईल, असा इशाराच महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे. त्यामुळे मक्तेदारांचे धाबे दणाणले आहे.
पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: दैना उडाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नाशिकमधील या 'खड्डेपुराणा'ची चर्चा थेट राज्य शासनापर्यंत पोहोचली आहे. गेल्या दहा दिवसांत दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आलेल्या जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या खड्डेमय रस्त्यांबाबत चिंता व्यक्त करत महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवार (दि.१७) महाजन यांनी थेट महापालिका मुख्यालयात बैठक घेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत रस्ते तातडीने दुरूस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त खत्री यांनी गुरुवार (दि.१८) बांधकाम विभागातील सर्व अभियंते व मक्तेदार यांची सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे व गुणवत्तापूर्ण काम करणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांकडून रस्तानिहाय खड्डे बुजविण्याची अद्ययावत माहिती घेतली. सर्वांनी साईटवर प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामामध्ये कसूर झाल्यास कुणालाही खपवून घेतले जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कामात झालेल्या दिरंगाईबाबत यापूर्वी नोटिसा दिलेले मक्तेदार सांगळे, बिन्नर, नायर, लुथ्रा व पेखळे या पाच मक्तेदारांना पुनश्च नोटिसा बजावण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी दिले असून, सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच आयुक्तांनी स्वत:च्या स्वाक्षरीने बिन्नर यांना थेट नोटीस बजावली आहे.