नाशिक : सिंहस्थ रस्ते कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या संशयातून कुंभमेळामंत्री महाजन यांनी आदेशाला एक दिवस उलटत नाही, तोच मुंबईतील २५ अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी (दि. १९) नाशिक महापालिकेत दाखल झाले. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत प्रस्तावित प्रत्येक रस्त्याचे प्राकलननिहाय दर या पथकामार्फत तपासले जात आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने तब्बल १५ हजार कोटींचा आराखडा तयार केला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसली, तरी पहिल्या टप्प्यात १,२०० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात केली जाणार असून, त्यापैकी ९३० कोटींच्या कामांना सिंहस्थ प्राधिकरणाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या रस्ते व पुलांच्या कामांसंदर्भात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. १७) महापालिकेत बैठक घेतली. 10 वर्षांपूर्वी १८८ किलोमीटरचे रस्ते ४६८ कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आले होते. आता मात्र या रस्ते कामांसाठी २,२९१ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुलनेत महापालिकेने रस्ते कामासाठी वापरलेले प्रतिकिलोमीटर दर दुपटीने अधिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाजन यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर लागलीच त्यांनी या रस्त्यांचे प्राकलन राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तपासणीचा निर्णय घेतला. महाजन यांच्या आदेशाला एक दिवस उलटत नाही, तोच मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नाशिक महापालिकेत दाखल झाले.
शुक्रवारी (दि.19) रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे २५ जणांचे पथक नाशिक महापालिकेत दाखल झाले. मात्र, पथकाला महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. महापालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तदेखील बैठकीत असल्याचे कारण देण्यात आले.