नाशिक : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रयागराजच्या धर्तीवर स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापनेला चालना मिळाली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शुक्रवारी (दि. २५) मंत्रालयात बैठक बोलविली आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या या बैठकीत प्राधिकरणाच्या कायद्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या बैठकीसाठी पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम आणि आयुक्त मनिषा खत्री यांना पाचारण करण्यात आले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिंहस्थासाठी महापालिकेसह व विविध शासकीय विभागांकडून एकूण १५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र सिंहस्थाला आता जेमतेम दोन वर्षांचा कालावधी उरला असताना या आराखड्याला मंजूरी मिळू न शकल्याने अद्याप सिंहस्थ कामांना सुरूवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे साधु-महंतांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता सिंहस्थ नियोजन फास्ट ट्रॅकवर घेतले आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिकच्या सिंहस्थासाठी स्वतंत्रपणे विशेष सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावे, यासाठी सिंहस्थ प्राधिकरण तयार केले जाणार आहे. यासाठी सिंहस्थ प्राधिकरण कायदा तयार करावा लागणार आहे. त्यासाठी आता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे यांनी बैठक बोलविली असून या बैठकीत प्राधिकरणाच्या कायद्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी प्राधिकरण कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. शुक्रवारी या मसुद्याचे सादरीकरण केल्यानंतर प्राधिकरणाचा कायदा करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.