नाशिक : २०२८ मध्ये उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी नाशिकमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा अधिक आहे. शासनाने तब्बल २१ हजार कोटींपेक्षा अधिक कामांची घोषणा केली. प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात झाली नसल्याने, गत कुंभमेळ्याच्या तुलनेत तयारी खूपच चिंताग्रस्त करणारी आहे.
साधुग्रामचा मुद्दा अजूनही निकाली काढता आला नाही. जमीन अधिग्रहणाचा विषय देखील प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देवून हा विषय आतापर्यंत संपविणे अपेक्षित होते. मात्र, ज्या पद्धतीने संपूर्ण तयारी सुरू आहे, त्यावरून तपोवनात कुंभाचे आयोजन करणे अवघड होईल. प्रयागराज येथे झालेल्या ऐतिहासिक कुंभमेळ्याप्रमाणेच नाशिक आणि त्र्यंबकचा कुंभमेळा होणार आहे. जगभरातून किमान २५ कोटी लोक नाशिकला येण्याचा अंदाज आहे. साधू, महंतांप्रमाणेच येणाऱ्या भाविकांसाठी देखील प्रशासनाला पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. कुंभाचा कमी कालावधी बघता, प्रशासनाने विकासकामांची गती वाढवायला हवी. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणातही साधू संत, पुरोहितचार्य, धर्मचार्य, जगदगुरू शंकराचार्य पीठातील अधिकृत व्यक्तींना स्थान द्यायला हवे, अशी अपेक्षा, संत, महंतांनी दैनिक 'पुढारी'च्या व्यासपीठावर व्यक्त केली.
आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'ने विविध आखाड्यांच्या संत, महंतांना आमंत्रित करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आयोजित चर्चेत पंचमुखी मंदिराचे प्रमुख आणि आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास, काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टचे महंत रामनारायण दाज (फलाहारी बाबा), दिगंबर आखाड्याचे महंत राजारामदास महाराज, महंत शंकरदास महाराज, महंत रामसणईदास महाराज सहभागी झाले होते. उपस्थित सर्वच साधू, महंतांनी शासन, प्रशासनाच्या सिंहस्थ कुंभमेळा कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केली. कुंभ हा धर्मक्षेत्राशी निगडीत आहे. कोणीही अधिकारी हे धर्मपंडित किंवा साधू संत नाहीत. त्यामुळे कुंभाचे आयोजन करताना वेळोवेळी, क्षणोक्षणी आणि पदोपदी धर्मशास्त्रीय मार्गदर्शन हे प्रशासनाला आणि शासनला लागणार आहे. दुदैवाने कुंभमेळ्यासाठी स्थापन प्राधिकरणावर एकाही साधू, महंताला स्थान दिले नाही. प्राधिकरणाअंतर्गत बनविलेल्या शिखर समितीत एकाही आखाड्याच्या प्रतिनिधीला स्थान दिले नाही. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंंग यांनी अद्यापपर्यंत स्थानिक साधू, महंतांशी चर्चा देखील केली नाही. नाशिक आणि त्र्यंबक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर स्थानिक साधू महंतांना विश्वासात घेवून कामे करावी लागणार आहेत.
महंत भक्तीचरणदास महाराज यांनी, जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण का केल्या जात नाहीत?, त्यांना योग्य मोबदला दिल्यास हा विषय संपू शकतो. प्रशासनाला संतांच्या सोयीसुविधांबरोबरच जगभरातून येणाऱ्या भक्तांनाही पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सर्वच भक्तांची साधुग्राममध्ये व्यवस्था करणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था करावी. तसेच रामकुंड येथे अमृतस्नानासाठी केवळ साधू, महंतांनाच संधी द्यावी. भक्तांनी गोदावरीच्या संगमामध्ये स्नान करण्यास सांगावे. कारण एकावेळी एवढ्या मोठ्या संख्येनी रामकुंडात स्नान करणे शक्य नाही. तसेच स्थानिक साधु, संतांच्या आश्रमात देखील सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नाशिक आणि त्र्यंबकमध्ये होणारा सिंहस्थ हा पावसाळ्यात येत असल्याने, पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. अशावेळी साधू, महंतांसाठी वॉटरप्रुफ आश्रम उभारणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने कामे करावीत. महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले की, गेल्या कुंभमेळ्यात पोलिसांनी अवास्तव बंदाेबस्त तैनात करीत एकप्रकारे कर्फ्यु लादला होता. अशाप्रकारेचे नियोजन यावेळी होऊ नये. तसेच जोपर्यंत आखाड्यांचे रामकुंडात शाही पूजन होत नाही, तोपर्यंत कोणालाही रामकुंडात स्नानास परवानगी देवू नये. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकच्या आजुबाजुच्या तब्बल ३०० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. ते दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. देशभरातील सर्व गुरूद्वारा सिंहस्थात लंगर लावणार आहेत. प्रयागराजमध्ये अदानी आणि अंबानी समुहांनी विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांनी नाशिकच्या सिंहस्थासाठी पुढे यावे. इतर धर्मियांचे आक्रमण होणार नाही, याचा देखील शासनाने बंदोबस्त ठेवावा.
महंत अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले, आजपर्यंत जेवढे कुंभ बघितले, त्यात एकाही ठिकाणी वृद्ध, अपंग, अंधांसाठी अमृतस्नानाची व्यवस्था केली गेली नाही. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात या लोकांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर तयार करावा. सिंहस्थ काळात यु-ट्यूबरवर विशेष लक्ष ठेवावे. साधू, महंत वर्षानुवर्षे एकांतात राहत असतात. जेव्हा लोक त्यांना त्रास देतात, तेव्हा त्यांचा संताप होतो. याच गोष्टी यु-ट्यूबर दाखवून हिंदू संतांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब होता कामा नये. तसेच राज्यपाल नियुक्त लोकप्रतिनिधीमध्ये संतांना देखील स्थान द्यावे. किमान तीन आमदार हे साधू, संत, महंत या क्षेत्रातील असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एकंदरीत नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू, महंतांच्या अनेक अपेक्षा असून, त्यातुलनेत प्रशासनाची तयारी ही खूपच कमी आहे. वेळ आणि कामे बघता, ती तत्काळ मार्गी लावण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.
कुंभमेळ्याची तयारी संथ गतीने सुरू आहे. गेल्या सिंहस्थात ज्या पद्धतीने तयारी केली गेली, त्या तुलनेत यंदा काहीच तयारी दिसून येत नाही. कदाचित पावसामुळे तयारीत विलंब झाला असावा. मात्र, कालावधी बघता प्रशासनाने गती वाढवायला हवी. प्रयागराजप्रमाणेच नाशिकला गर्दी येणार आहे. मात्र, प्रशासनाची तयारी अपुरी दिसून येत आहे. साधूग्रामचे काम लवकर सुरू करायला हवे. २०२८ मध्ये उज्जैनमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आपल्यापेक्षा अधिक आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये कुंभमेळ्याचे ध्वजारोहण केले जाणार आहे. साधुग्रामच्या जागेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.महंत भक्तीचरणदास महाराज, वैष्णव आखाडा
बारा वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभानिमित्त जगभरातील पर्यटक या भूमीत येत असतात. त्यातून आर्थिकतेला मोठी चालना मिळते. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त सोयीसुविधा साधू संतांसाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वातून येणाऱ्या भाविकांसाठी देखील तत्काळ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. कारण वेळ कमी आहे. तसेच प्राधिकरणामध्ये साधू-संतांना कुठल्याही प्रकारचे स्थान नसणे दुदैवी आहे. कुंभ हा धर्मक्षेत्राशी निगडीत आहे. कोणीही अधिकारी हे धर्मपंडित किंवा साधू संत नाही. त्यामुळे वेळोवेळी, क्षणोक्षणी, पदोपदी धर्मशास्त्रीय मार्गदर्शन हे प्रशासनाला, शासनाला लागत आहे. त्यामुळे साधू संतांना, पुरोहितचार्याना, धर्मचार्यांना, जगदगुरू शंकराचार्य पीठातील अधिकृत व्यक्तींना यामध्ये स्थान द्यावे.महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, नाशिक
मुख्यमंत्र्यांनी राममथ आणि इतर कामांच्या अनुषंगाने २१ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन केले आहे. मात्र, बरीच कामे प्रलंबित आहेत. कुंभमेळ्याचा विचार करता ज्या भव्यतेमध्ये प्रयागराजचा कुंभमेळा झाला. त्या तुलनेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २५ कोटी लोक येण्याचा अंदाज आहे. त्या स्वरुपात येथील सोयी नगण्य आहेत. तपोवनमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा काही संघटनांनी पुढे आणला आहे. गेले तीन कुंभमेळ्यांमध्ये तपोवनात वृक्षांची छाटणी होते. भरपावसात नाशिकचा कुंभमेळा होत असल्याने त्याठिकाणी वॉटरप्रुफ टेन्ट व इतर सुविधा द्याव्या लागतात. त्यामुळे वृक्षतोड अत्यावश्यक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे राजकीय वळण देवू नये.महंत सुधीरदास पुजारी, नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुळस्थान श्री कपिलधारा तीर्थस्थान येथे १७ ऑगस्ट २०२७ रोजी शुद्ध पौर्णिमेला विशेष पर्वस्नान होणार आहे. हा योग १२५ वर्षांनी जुळून आला आहे. तरी सर्व तिन्ही आखाडे श्री जगदगुरू, श्रीमहंत, साधु संत पर्व स्नानासाठी येथे येणार आहेत. तसेच जनसामान्य देखील याठिकाणी पर्वस्नानासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने याठिकाणी येणाऱ्या साधू, संत, महिला, पुरुष, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.महंत रामनारायणदास (फलारीबाबा), नाशिक
नाशिकमध्ये सिंहस्थ-कुंभमेळ्यासाठी २० ते २५ कोटी लोक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कामे मार्गी लावायला हवीत. जागेचा जो वाद आहे, तो समोपचाऱ्याना मिटवायला हवा. जे लोक जागा देत आहे, त्यांना योग्य मोबदला द्यावा. जे भाड्याने देवू इच्छितात, त्यांच्याकडून भाड्याने जागा घ्यावी. सध्या वृक्ष तोडीवर वाद सुरू आहे. मात्र, शासनाने अशी व्यवस्था करायला हवी, जेणेकरून ही वेळच उद्भवणार नाही. साधू, संत याठिकाणी येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी स्वत:हून समोर यावे. वाद न घालता समोपचाराने सर्व प्रश्न मार्गी लावावेत.महंत रामस्नेहीदास महाराज, नाशिक
महंत भक्तीचरणदास महाराज, वैष्णव आखाडाया मुद्यांवर झाले मंथन
नाशिक आणि त्र्यंबकचा विकास करताना सर्वतीर्थ टाकेद व अन्य हिंदू धर्मिय धार्मिक स्थळांचाही विकास करावा.
साधू, संतांच्या आश्रमांमध्ये विविद सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
नाशिकच्या विमानतळाचा विकास जलद करावा. जेणेकरून जगभरातील भाविकांना नाशिकमध्ये तत्काळ पोहोचणे शक्य होईल.
राज्यपाल कोट्यातून किमान तीन आमदार साधू, संतांमधून निवडले जावेत.
अंध, अपंग आणि वृद्धांच्या स्नानासाठी स्वतंत्र कॉरिडॉर उभारावा.
त्र्यंबक आणि नाशिकमधील सिंहस्थ पावसाळ्यात येत असल्याने, याठिकाणी वॉटरप्रुफ तंबू उभारावेत.
नाशिक आणि त्र्यंबकच्या आजुबाजूचे तब्बल ३०० किलोमीटरच्या रस्त्यांचे कामे व्हावीत.
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात चार लाख कोटींची उलाढाल, नाशिकमधील सिंहस्थात पाच लाख कोटींची व्हावी उलाढाल.