नाशिक : आगामी सिंहस्थकाळात साधू- महंत व भाविकांबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीदेखील स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. त्यांच्या सुविधेसाठी नाशिकच्या रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाजवळ हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण समितीने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेला हेलिपॅडसाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
२०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. कुंभमेळ्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात विधिमंडळ अधिवेशनात एक हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. त्याआधारे कुंभमेळा प्राधिकरण समितीने निधी नियोजन करत ३,०३६ कोटी रुपयांच्या कामांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत प्राधान्यक्रमाने विकासकामांवर निधी खर्च करण्याच्या सूचना प्राधिकरणाकडून दिलेल्या आहेत. सिंहस्थांतर्गत तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर सोपविण्यात आली असून, त्यानुसारच रस्ते डांबरीकरणाची कामे हाती घेण्याचे निर्देश नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला देण्यात आले आहेत. भाविक रस्ते मार्गाने येणार असले, तरी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने जागेचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रामकुंड तसेच कुशावर्त कुंड परिसरात हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे या क्षेत्रापासून किमान चार ते पाच किलोमीटर अंतरावर हेलिपॅड तयार करावे लागणार आहे. या तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाची मात्र कोंडी झाली आहे.