नाशिक : गेल्या कुंभमेळ्याचे जगभरात कौतुक केले गेले. अमेरिकेने आम्हाला बोलावून तुम्ही गर्दीचे नियोजन कसे केले? याबाबतची विचारणा केली. एकही अपघात नाही, मृत्यू नाही की कोणी हरवले नाही. मात्र, यंदाचा कुंभमेळ्या गेल्यावेळच्या कुंभमेळ्यापेक्षा वेगळा आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्याने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. नाशिकमध्ये चारपट मोठा कुंभमेळा होणार असल्याने, कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी केले. तसेच स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळ्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठक्कर डोम मैदान येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री महाजन म्हणाले, प्रयागराजला होणारा कुंभ मोठ्या जागेत होताे. तिथे नदीचा तट असून, तो किलोमीटरमध्ये आहे. आपल्याकडची स्थिती वेगळी आहे. नाशिकला रामकुंड आहे, तर त्र्यंबकेश्वरला छोटा कुंड आहे. याठिकाणी कोटींच्या संख्येनी येणारे भाविक जेव्हा याठिकाणी स्नान करणार, तेव्हा आपली मोठी परीक्षा असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होण्याची गरज आहे. कुठेही कोणाला दुखापत होणार नाही, मृत्यू होणार नाही वा अप्रिय घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आम्ही कामाला लागलो आहोत. सहा मंत्र्यांची टीम आणि अधिकारी रात्र दिवस कामे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनपा आणि पोलिस आयुक्तांचे कौतुक
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचे कौतुक करताना मंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळा असल्याने नाशिकला महिला अधिकारी द्यायचे काय? याबाबत पेच होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांची निवड केली असून, त्यांनी ती सार्थ ठरविली आहे. आयुक्त मनीषा खत्री अतिशय झपाट्याने काम करीत आहेत. वेळेचे भान हरवून त्या कामे मार्गी लावत आहेत. कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग हे देखील वेगाने काम करीत आहेत. हा कुंभ मला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करायचा आहे. येथे कोणाचीही गुंडगिरी, दादागिरी चालणार नाही. चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. नाशिक शहरामध्ये सुरक्षेच्यादृष्टीने आपण समाधानी आहात काय? असे विचारत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांची टीम जबरदस्त काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोकांनी शहराला वेठीस धरले होते. मुख्यंमत्र्यांनी सूचना देताच, आयुक्त कर्णिक यांनी गुंडांचा बंदोबस्त केला आहे. सध्या काही गुंड देवधर्म करण्यासाठी काश्मीरपर्यंत पळत आहेत. आम्हाला वाचव म्हणून देवाकडे प्रार्थना करीत असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.