नाशिक : सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ३९५ कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेला नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेतून साधूग्राममध्ये दोन जलकुंभासाठी आठ कोटी, विल्होळी येथे २७४ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणी तसेच विल्होळी ते साधूग्रामपर्यंत जलवाहीनी टाकली जाणार आहे. निविदा प्रक्रियेत असलेल्या सिंहस्थ पाणीपुरवठा योजनेला यामुळे चाल मिळणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत व भाविक तसेच शहरातील भविष्यकालीन वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी मुकणे धरणातून विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. यापूर्वी २०१७ मध्ये मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेमधून सध्या विल्होळी पर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी येते. या ठिकाणी १३७ एमएलडी प्रतिदिन पाणी शुद्धीकरण करण्यासाठी चार केंद्रे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीमध्ये एकच केंद्र सुरू आहे. आता विस्तारीत योजनेत विल्होळी येथे २७४ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. या सर्वांना पाणी पुरविण्याच्या दृष्टिकोनातून सिंहस्थ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. सिंहस्थापूर्वी ही योजना होणे आवश्यक असल्यामुळे या योजनेची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यात आता नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेला चालना मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. तसेच साधूग्राम पर्यंत जलवाहीनी टाकली जाणार असून, दोन दशलक्ष लिटर क्षमेतेचे दोन जलकुंभ उभारले जाणार आहे. या योजनेद्वारे पंचवटी विभागातील थेट आडगावपर्यंत पाणी पुरवठा केला जाईल. मुकणेतून कन्नमवार पुलापर्यंत जलवाहिनी येणार असून त्यामुळे द्वारका तसेच घोडेबाबानगर पर्यंत पाणीपुरवठा करता येईल.