नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिकलसेल अॅनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून, तो आई - वडिलांकडून पुढील पिढीमध्ये म्हणजे मुलांमध्ये पिढ्यान्पिढ्या संक्रमित होत राहतो. या आजारामध्ये तांबड्या रक्तपेशींचा आकार बदलून त्या कोयत्याच्या पात्यासारख्या होतात त्याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होतो.
त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन शरीराच्या विविध अवयवांवरही गंभीर परिणाम होतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रुग्णाचा चेहरा निस्तेज दिसतो. डोळे पिवळसर होतात. काही वेळा अचानक तीव्र वेदनाही होतात.
राज्यभरात दिवसेन्दिवस रुग्ण वाढत असताना, नाशिक जिल्ह्यात याचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. २०२५ डिसेंबर अखेर ५ हजार ३८३ रुग्णांच्या तपासणीत वाहक गटात ४२, तर सफर म्हणजे प्रत्यक्ष बाधित रुग्णाची लक्षणे असलेले १६ रुग्ण आढळून आले आहेत.
ही घ्यावी खबरदारी सिकलसेल
अॅनिमिया पूर्णपणे बरा होत नसला, तरी वेळेवर तपासणी, नियमित उपचार, योग्य समुपदेशन व जनजागृतीद्वारे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. विवाहापूर्वी दोघांनीही सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात सिकलसेल आजार असल्यास सर्व सदस्यांनी तपासणी करुन घ्यावी. वाहक म्हणजे रुग्ण नसतो. मात्र, पुढील पिढीसाठी धोका असल्याने खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. गर्भवती महिलांसाठी सिकलसेल तपासणी अनिवार्य असून आवश्यक असल्यास गर्भनिदानाची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांनी दररोज पुरेसे पाणी पिणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक अॅसिड गोळ्या घेणे, संतुलित आहार घेणे, दारू व धूम्रपान टाळणे आवश्यक आहे. अतिउष्णता, अतिथंडी व उंच डोंगराळ भागात जाणे टाळावे.
सिकलसेलचे प्रकार
या व्यक्तींमध्ये सहसा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. अत्यंत सौम्य लक्षणे असतात. मात्र, पुढील पिढीत सिकलसेल आजार जाण्याची शक्यता असते.
सिकलसेल रुग्ण
या व्यक्तींमध्ये आजाराची गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यांच्या अपत्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
सिकलसेल लक्षणे
हातपायांना सूज येणे, सांधेदुखी, तीव्र वेदना, प्लीहा वाढणे, वारंवार सर्दी खोकला, सौम्य ताप, लवकर थकवा येणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन चेहरा निस्तेज दिसतो. डोळे पिवळसर होतात. काही वेळा अचानक तीव्र वेदना होतात.
सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. वाहक स्वतः रुग्ण नसतात. परंतु, पुढील पिढीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विवाहापूर्वी तपासणी करणे, समुपदेशन घेणे आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर तपासणी, नियमित उपचार व जनजागृतीच्या माध्यमातून रुग्णांचे जीवनमान सुधारता येते. -डॉ. चंद्रशेखर आवारे, वैद्यकीय अधिकारी, रक्तविज्ञान विभाग, जिल्हा रुग्णालय