नाशिक : लिथियम-आयन बॅटरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या ग्राफाइट इंडिया लिमिटेड या कंपनीकडून नाशिकच्या इगतपूरी तालुक्यातील गोंदे, मुंढेगाव येथे तब्बल चार हजार ७६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याबाबतचा राज्य सरकार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी (दि.२९) सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून ११६६ रोजगार निर्मिती होणार आहे.
उद्योगांसाठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. इगतपूरी तालुक्यातील आडवण व पारदेवी येथे महिंद्रा कंपनीचा ईव्ही प्रकल्प येणार असल्याने, इगतपूरी तालुक्याचे औद्योगिकदृष्ट्या महत्त्व वाढत आहे. आता याच तालुक्यातील गोंदे, मुंढेगाव एमआयडीसीत ग्राफाइट इंडिया या कंपनीकडून मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह एमआयडीसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने याबाबतचा सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणूकीतून एक हजार १६६ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पस्थळी लिथियम-आयन बॅटरीचे नाविन्यपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग केले जाणार आहे. कंपनीचा हा प्रकल्प पर्यावरणीय शाश्वतेला प्राधान्य देणार आहे.
विद्युत उपकरणे उत्पादनात अग्रेसर असलेल्या व्हर्च्युओसो आॅप्टोइलेक्ट्रॉनिक कंपनीकडून दिंडोरी तालुक्यात ८०० कोटींचा विस्तार केला जाणार आहे. याबाबतचा देखील राज्य सरकारसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या गुंतवणूकीतून तब्बल प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोलर्स, कंप्रेसर, एसी आणि वॉशिंग मशीनसाठीच्या मोटर्सचे उत्पादन घेतले जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाठपुराव्याचे आज फलित झाल्याचा आनंद होत आहे. महिंद्रापाठोपाठ ग्राफाइटची गुंतवणूक जिल्ह्यातील लघु उद्योगांना बुस्ट देणारी ठरेल. याशिवाय दिंडोरीमध्ये केली गेलेली गुंतवणूक दिंडोरीमध्ये इतर उद्योगांना आकर्षित करण्यात फायदेशीर ठरेल.धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा, नाशिक.