नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी आमदारांच्या मागील रांगेत बसविल्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकाराचा निषेध करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी (दि. २) सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी 'कुंभमेळा नाशिककरांचा की, भाजपचा?' असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे गटाच्या नगरसेवकांसह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्राधिकरणाच्या कारभारावर आक्षेप नोंदвит जोरदार घोषणाबाजी केली.
गोदावरी तीरावर शनिवारी (दि. ३१) झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात खा. वाजे यांना सत्ताधारी आमदारांच्या मागील रांगेने नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याची भावना उबाठा गटाने व्यक्त केली. हा प्रकार केवळ एका खासदाराचा अपमान नसून, संपूर्ण नाशिककरांच्या स्वाभिमानाला धक्का देणारा असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांसह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत प्राधिकरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कुंभमेळा प्राधिकरण आणि सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, प्राधिकरणावर ढिसाळ नियोजनाचा आरोप केला.
कार्यक्रमात नगरसेवकांचा अवमान करण्यात आल्याचे सांगतानाच अनेक दिवस तयारी करूनही मुख्य सोहळ्यातदरम्यान गोदावरीत प्रदूषित पाणी सोडण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करताना स्थानिक जनभावना, नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि शहराचा सन्मान यांना प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
कुंभमेळा हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून, तो नाशिककरांचा उत्सव असल्याचे नमूद करतानाच, आंदोलनादरम्यान कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला. कुंभमेळ्याच्या नियोजन प्रक्रियेत नाशिककरांचा सक्रिय सहभाग असावा, नाशिकच्या लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान मिळावा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर राखला जावे,
अशा प्रमुख मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले. निवेदनात खासदार राजाभाऊ वाजे यांना दिलेली दुय्यम वागणूक ही निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबद्दल कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, भविष्यात पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनी दिली.
देवळाली कॅम्प : कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रपतींनी भर्गूचे भूमिपुत्र क्रांतिवीर वि. दा. सावरकर यांचा आवर्जून उल्लेख केला. मात्र, त्याच सोहळ्यात प्रशासनाकडून नगराध्यक्षांबाबत दुजाभाव झाल्याचा आरोप नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त, पालकमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.
त्यात कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमात त्यांना अधिकृत पास देण्यात आलेला होता. त्यामुळे आपण त्या ठिकाणी निर्धारित वेळेत बैठक व्यवस्थेत पोहोचलो. मात्र, कार्यक्रमस्थळी आपल्याला अवमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्याला निर्धारित जागेवरून मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.