नाशिक

Shirpur Health Center | शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद; रस्त्यावरच करावी लागली महिलेची प्रसूती

Shirpur Health Center | शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथे आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

प्रतिनिधी | सोनगीर

शिरपूर तालुक्यातील वाडी बु. येथे आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्या ठिकाणी ग्रामस्थांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळायला हवे त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दरवाज्याला कुलूप असल्यामुळे एका गरोदर महिलेला रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ आली.

शिरपूर तालुक्यातील मोखड येथील वाड्यावर राहणारी एक गर्भवती महिला सकाळी सुमारे ६ वाजता प्रसूतीसाठी वाडी बु. प्राथमिक आरोग्य केंद्रावर आली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या आरोग्य केंद्राचे सर्व दरवाजे बंद होते. प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते.

महिलेच्या नातेवाईकांनी बराच वेळ आवाज दिला , अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने महिलेला उपचारा विनाच माघारी घेऊन जाऊ लागले. दरम्यान परत जात असताना बसस्थानकावर महिलेच्या प्रसूती वेदना जास्तच वाढल्या अखेर जिल्हा परिषद शाळेजवळील दुकाने टपर्यांच्या आडोश्याला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली.

समस्त प्रकार पाहून स्थानिक ग्रामस्थानी मदतीसाठी धाव घेतली. एका चहा विक्रेत्याने तत्काळ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले. नंतर प्रसूत महिलेला आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. परंतु नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार आरोग्यककेंद्रात आणल्या नंतरही बराच वेळ कोणताही उपचार करण्यात आला नाही.

आरोगकेंद्रात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय इमारत उपलब्ध असूनही एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथे राहत नसल्याने हे आरोग्यकेंद्र रामभरोसे चालत असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रात ३ वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. तरी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

एकीकडे विकासच्या घोषणा, आधुनिक आरोग्य सुविधांचे दावे, तालुक्याला मल्टीस्पेसिलिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाची तयारी, आणि दुसरीकडे ढासळती ग्रामीण आरोग्य केंद्राची व्यवस्था. महिलेला रस्त्यावर प्रसूती करावी लागणं ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे.

या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करून सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे . लोकप्रतिनिधींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आता फक्त संताप व्यक्त न करता कायदेशीर कारवाईचा प्रश्न उचलून धरावा अशी मागणी होत असून , शिरपूर तालुक्याला लागलेला डाग आरोग्य प्रशासन कसं पुसणार अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT