नाशिक

Wildflowers | सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा अद्भुत आविष्कार! शिरपुंजे-भैरवगड परिसर रंगीबेरंगी रानफुलांनी बहरला

Wildflowers | सोनकी, कारवी, सीतेची आसवे यांच्यासह सजला नैसर्गिक गालिचा

पुढारी वृत्तसेवा

घोटी : राहुल सुराणा

पावसाळ्यानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांचे रूप पालटले असून, अकोले तालुक्यातील शिरपुंजे, भैरवगड, रतनगड परिसरातील गवताळ पठारे विविध रंगांच्या रानफुलांनी बहरली आहेत. हिरव्यागार गवतामध्ये उमललेली पिवळी, निळी, जांभळी आणि पांढरी फुले पाहून डोंगररांगांवर जणू नैसर्गिक फुलांचा गालिचाच पसरल्याचे मनोहारी चित्र दिसत आहे.

या परिसरात सोनकी, तेरडा, कारवी, सीतेची आसवे, नभाळी, हलुंदा, गवती दवबिंदू, सीतेची वेणी, दीपकाडी, गेंदा, टणटणी (घाणेरी), रामबाण, रानकांदा, खारफुटी व भुईचक्र यांसारख्या विविध रानफुलांनी बहर आला आहे. विशेषतः सोनकीच्या पिवळ्या फुलांनी सजलेले गवताळ उतार निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पावसाळ्यानंतर अल्पकाळासाठी उमलणारी ही रानफुले सह्याद्रीच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करतात. मात्र, फुलांपेक्षा त्यांचा नैसर्गिक अधिवास अधिक महत्त्वाचा असल्याने पर्यटकांनी त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.

फुले तोडणे, त्यांच्यावर पाय देणे, प्लास्टिक कचरा टाकणे अथवा डोंगरावर आग लावणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिवास जपा, तरच निसर्गसोहळा अनुभवाल

फुले तोडण्यापेक्षा त्यांची छायाचित्रे काढा आणि हा निसर्गसोहळा पुढील पिढ्यांसाठी जतन करा, असे आवाहन करण्यात आले आहे. रानफुलांचा हा रंगोत्सव काही दिवसांचाच असला, तरी त्यांचा अधिवास जपला, तर हा निसर्गसोहळा दरवर्षी अनुभवता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT