नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांमधील घोळाविरोधात उद्धव आणि राज ठाकरे यांनी जोरदार रान पेटवले असताना आता राज्याच्या सत्तेतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेदेखील या मतदार याद्यांविरोधात दंड थोपटले आहे.
शहरातील विधानसभा मतदारसंघात सुमारे तीन लाख बोगस, दुबार मतदार असल्याचा आरोप करत दुबार नावे वगळून पारदर्शक पद्धतीने मतदारयाद्या तयार करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गट लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. अभय महादास व महानगरप्रमुख अॅड. हर्षल केंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिवसेनेच्या लीगल सेलने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात अनेक गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
दुबार नावे, जिल्ह्यातील अन्य भागांतील नावे विशिष्ट विधानसभा मतदारसंघात टाकणे, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तीची नावे दोन दोन ठिकाणी असणे, असे अनेक आक्षेप आहेत. त्यावर सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनामधून उपाय सुचवण्यात आले आहे. देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात दुबार नावे वगळावीत. सध्या अनेक मतदारसंघांत एकाच व्यक्तीची नावे दोन किंवा अधिक वेळा नोंदवलेली असल्याने दुबार नावांची त्वरित तपासणी आणि पंचनामे करत ती वगळण्यात यावीत.
एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघातच असावे, याची खात्री करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुबार नावांची छाननी केली जावी. अनेक कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांत किंवा विभागात चुकीच्या पद्धतीने नोंदवली असून, कुटुंब एकत्रीकरण मतदार करण्याची प्रणाली राबवण्यात यावी. एकाच ठिकाणी वास्तव्य असलेल्या संपूर्ण कुटुंबाच्या नावांची एकाच मतदारयादीत यावीत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि सुधारणा केंद्र सुरू करावीत. मयत व्यक्तींची नावे वगळावी. नागरी नोंदणी कार्यालय आणि मतदारयादीचा डेटा जोडून मृत व्यक्तींची नावे स्वयंचलितपणे वगळण्यात यावीत. मतदारांची नावे योग्य मतदान केंद्रातच असावीत. निवडणूक आयोगाने याद्यांचे पुनरावलोकन करून अशा त्रुटी दूर कराव्यात. मतदार नोंदणी करताना आधार, पॅन, जन्मदाखला या दस्तऐवजांचा आधार घ्यावा, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
संशयास्पद बोगस दुबार मतदार असे...
विधानसभा मतदारसंघ - एकूण दुबार
नाशिक पूर्व - ८६२३९
नाशिक मध्य - ५८०३४
नाशिक पश्चिम - ९३५७४
देवळाली - ६१००६
एकूण दुबार मतदार - 2,98,853