Sugar Factory  Pudhari
नाशिक

Nashik Sugar Factory Protest | राजगंगा समूहाच्या मनमानीविरोधात शेतकरी आक्रमक; धाराशिवमध्ये 'नासाका'च्या आंदोलनाचा इशारा

Nashik Sugar Factory Protest | 'नासाका'चे आंदोलन धाराशिवमध्ये करणार

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नाशिक सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचा घामाचा पैसा बुडवणाऱ्या राजगंगा समूहाविरोधात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने दंड थोपटले आहेत. शेतकरी व कामगारांचे थकीत पेमेंट सात दिवसांच्या आत करा अन्यथा राजगंगा समूहाच्या माध्यमातून धाराशिवमध्ये सुरू होऊ पाहाणाऱ्या दोन कारखान्यासमोर शेतकरी आंदोलन करू, असा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी दिला.

पळसेतील नासाका कारखाना चालविणाऱ्या राजगंगा समूहाने ऊस शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून थकीत असलेले कोटीवधी रुपये आणि कामगारांचे वेतन थकविलेले आहे. आता या समूहाने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, तसेच बूम तालुक्यातील बाणगंगा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेला आहे.

हे दोन्ही कारखाने संबंधित कंपनीच्या माध्यमातून चालू गळीत हंगाम घेण्याच्या तयारीेत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, नासाका बचाव कृती समिती अध्यक्ष विलास गायधनी, कैलास टिळे, रमेश गायकर, रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले,

अंबादास ढिकले आदींच्या शिष्टमंडळाने धाराशिव येथील राजगंगा ग्रुपच्या कारखान्यास भेट देऊन तेथील अधिकारीवर्गाला राजगंगा समूहाने नाशिक कारखान्यात केलेल्या गैरकारभाराबाबत माहिती दिली. तसेच शेतकरी आणि अधिकाऱ्यांना निवेदन देत कंपनीचे संचालक घावटे यांना शेतकरी संघटनेने निर्वाणीचा इशारा दिला आहे.

सहा महिने झाले, तरीही पेमेंट नाही:

मागील गळीत हंगामात नाशिकच्या शेतकऱ्यांनी राजगंगा ग्रुपच्या पळसे कारखान्याला ऊसपुरवठा केला. मात्र, सहा महिने उलटूनही हक्काचे पैसे मिळाले नाहीत. बियाणे, खते, बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, घरचा उदरनिर्वाह यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. कामगारांचीही उपासमार सुरू आहे.

कारखाना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरा करूनही केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. संघटनेने यापूर्वी राजाराम घावटे व प्रसाद घावटे यांची थेट भेट घेऊन जाब विचारला होता. त्यावेळी २० ऑक्टोबरपर्यंत सर्व देणी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ते आश्वासनही हवेत विरते की काय, अशी परिस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT