मालेगाव : परिसरात गोरक्षकांच्या मदतीने वडनेर खाकुर्डी पोलिसांनी कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेल्या सात गाईंची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २३) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील एका वडगाव ग्रामपंचायतीसमोर करण्यात आली.
कुसुंबा गावाकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एए ६२१७) मध्ये गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांसह गोरक्षकांनी वाहन अडवले असता सात गायींचे पाय व तोंड दोरीने घट्ट बांधलेले आढळून आले. जनावरांना इजा होईल अशा पद्धतीने त्यांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती. तसेच गायींच्या खरेदीची पावती वा वाहतुकीचा कोणताही परवाना वाहनचालकाकडे नव्हता.
या कारवाईत वाहनचालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शेख युसूफ शेख भिकन (रा. पवारवाडी) याला पकडण्यात आले. मात्र, त्याचे साथीदार आवेश, मुस्तकीन व जमीर ऊर्फ समीर हे फरार झाले आहेत. सदर प्रकरणी मानद प्राणी कल्याण अधिकारी विनोद निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ६४ हजार रुपये किमतीची सात जनावरे व १ लाख २० हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व गायींना श्री गोशाळा पांजरपोळ संस्था, दाभाडी येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिरसाट, पोलिस हवालदार पाटील, पोलिस नाईक बाचकर, पोलिस अंमलदार सोमवंशी, तसेच गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विनोद निकम, प्रभाकर देसले, पंकज अहिरे, महेंद्र अहिरे यांच्या मदतीने करण्यात आली.