Earthquake 
नाशिक

Nashik Earthquake | जिल्ह्यात भूकंपांची मालिका सुरूच; पेठ, सुरगाणा, दिंडोरीचा परिसर हादरला

Nashik Earthquake | नागरिकांमध्ये भीती : सोमवारी पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात भूकंपांची मालिका सुरूच असून, सोमवारी (दि. १७) पहाटे ५ च्या सुमारास आणि दुपारी १२.४५ च्या सुमारास जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यांतील काही भागांना पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. यात मूरूमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात या धक्क्यांची नोंद झाली.

या भागात सलग भूकंपाच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्रीय केंद्राच्या नोंदीनुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ६ मिनिटे ४३ सेकंदांनी २.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २०.४५७ आणि रेखांश ७३.६९१ येथे असून, त्याची खोली ५ किलोमीटर होती.

त्यानंतर दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ३१ सेकंदांनी ३.२ रिश्टर क्षमतेचा आणखी एक भूकंप नोंदविण्यात आला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २०.४९९ आणि रेखांश ७३.८०० येथे असून, त्याची खोलीदेखील ५ किलोमीटर असल्याचे भूकंपशास्त्रीय केंद्राच्या नोंदीत नमूद आहे. या दोन्ही घटनांची पडताळणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. विशेषतः पेठ, सुरगाणा आणि कळवण तालुक्यांच्या परिसरात यापूर्वीही भूकंपांच्या घटनांची नोंद झाली आहे. सोमवारी पुन्हा दोन धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बाडगीचापाडा परिसरात सोमवारी (दि. १७) दुपारी १२.४५ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची माहिती नाही.

सुरगाणा - बोरगाव परिसरातही धक्के

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात सोमवारी (दि. १७) दुपारी १२.४० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले. प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात आली असून, सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. पेठ तालुक्यातील काही गावांना हादरा

पेठ तालुक्यातील गोंदे, बायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव येथे सोमवारी (दि. १७) दुपारी १२.४० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT