digital arrest scam file photo
नाशिक

Senior citizen loses 42 lakh in digital arrest scam|'डिजिटल अरेस्ट'द्वारे ज्येष्ठास ४२ लाखांचा गंडा

घरातच कोंडून मुंबई पोलिसांच्या नावाने भीती

पुढारी वृत्तसेवा

Senior citizen loses 42 lakh in digital arrest scam

नाशिक : 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४२ लाख ६० हजार ४३४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. दि. २२ ते २८ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडला. फसवणूक करणाऱ्या संशयितांनी ज्येष्ठ नागरिकाशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत आपण मुंबई पोलिसांतून बोलत असल्याचे भासविले.

मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तुमचा सहभाग असल्याचे सांगून अटकेची धमकी देण्यात आली. त्यानंतर तपासाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला घरातच कोंडून ठेवत बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधू नये, अशा प्रकारे दबाव निर्माण करण्यात आला. संशयितांनी व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल तसेच व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या माध्यमातून नागरिकावर मानसिक दबाव वाढविला.

मनी लाँड्रिंग प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी सांगितलेल्या बँक खात्यांवर ज्येष्ठ रक्कम जमा करण्यास भाग पाडण्यात आले. संशयितांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकाने दोन टप्प्यांत तब्बल ४२ लाख ६० हजार ४३४ रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र, त्यानंतरही संशयितांकडून संपर्क सुरू राहिल्याने या प्रकाराबाबत संशय निर्माण झाला.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या पुतण्याला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने चौकशी केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार ऑनलाइन सायबर फसवणुकीचा असल्याची खात्री झाल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, 'डिजिटल अरेस्ट' नावाचा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही. नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरून पैसे जमा करू नयेत. अशा प्रकारचा फोन, व्हिडिओ कॉल किंवा संदेश आल्यास तातडीने आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याची माहिती द्यावी आणि जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT