Second Hand Car Pudhari
नाशिक

GST on Second Hand Cars: सेकंड हॅन्ड कार आता 'डिलर्स'च्या खिशाला भार, ग्राहकांमध्ये खुशी; ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठी उलथापालथ

GST on Used Cars: जीएसटी दर बदलांमुळे ग्राहकांमध्ये 'खुशी'; तर जुन्या कारविक्रेत्यांमध्ये 'गम'

पुढारी वृत्तसेवा

GST on Second hand cars, now a burden on the pockets of 'dealers'

नाशिक : सतीश डोंगरे

जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत केंद्र सरकारने तब्बल 400 वस्तूंवरील वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी दरांमध्ये सुधारणा केल्याने, अनेक नित्योपयोगी वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम होणार आहे. ऐन सणासुदीत वस्तूंच्या किमती कमी होणार असल्याने, ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: ऑटोमोबाइल क्षेत्रात या निर्णयामुळे मोठी उलथापालथ होणार आहे.

वाहनांच्या किमती 50 हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत कमी होणार असल्याने, यंदाचा दसरा या क्षेत्रासाठी सीमोल्लंघन करणारा ठरणार आहे. तसेच दिवाळीतही खरेदीचे मोठे बार उडणार असल्याने, नव्या वाहनांच्या बाजारात सध्या ’खुशी’चे वातावरण आहे. तर सेकंडहॅन्ड वाहन बाजाराला हा निर्णय जोरदार धक्का देणारा ठरणार असल्याने डिलर्समध्ये ’गम’चे वातावरण आहे. जीएसटीचे नवे दर येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार असले तरी, सेकंडहॅन्ड वाहनांच्या डिलर्सने आतापासूनच त्याचा मोठा धसका घेतला आहे. याबाबतचा हा ग्राउंड रिपोर्ट...

पूर्वी दारात दोनचाकी वाहन उभे असणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. जर चारचाकी असेल तर तो व्यक्ती ‘श्रीमंत’. कालांतराने चारचाकी घेणे सर्वसामान्यांनाही सहज शक्य झाले. अर्थात बँकांच्या अर्थसहाय्यामुळे चारचाकीचे स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले. मात्र, अजूनही असा बराच समुदाय आहे, जो आपली ‘ड्रीम कार’ सेकंडहॅन्ड कारमध्येच शोधतो. त्यामुळेच शोरूम कारपेक्षाही सध्या सेकंडहॅन्ड कारच्या मार्केटचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे. या क्षेत्रातील मोठ्या नफ्याचे अर्थकारण बघता, डिलर्सने या क्षेत्रात कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे. नाशिकमध्ये तर सेकंडहॅन्ड कारचे भलेमोठे शोरूमच उभारले आहे. मागील दोन-तीन वर्षांचा विचार केल्यास, ‘सेमी कंडक्टर चीप’ व अन्य कारणांमुळे सेकंडहॅन्ड कारच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यातच सेकंडहॅन्ड कारच्या अधिकृत डिलर्सना जीएसटीच्या कक्षेत आणल्याने, या कारच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे ‘सेकंडहॅन्ड कार, ग्राहकांच्या खिशाला भार’ असे म्हणण्याची वेळ आली होती. असे असले तरी, नवीन कार खरेदीचे बजेट नसलेल्यांना सेकंडहॅन्ड कारचाच आधार असल्याने, आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिलर्सने सेकंडहॅन्ड कारमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.

मात्र, केंद्र सरकारने जीएसटी दरांची फेररचना केली अन् सेकंडहॅन्ड कारच्या उसळत्या मार्केटला काहीशी घसरण लागली. नव्या कारबरोबरच सेकंडहॅन्ड कारच्या किमतीदेखील मोठ्या फरकाने कमी झाल्याने, आता ‘सेकंडहॅन्ड कार, डिलर्सच्या खिशाला भार’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक सेकंडहॅन्ड कारमागे किमतीच्या 10 ते 12 टक्के इतका फटका कारविक्रेत्यांना सोसावा लागणार आहे. असे असले तरी, जीएसटी दरांचा बदल सेकंड कारसाठीदेखील फायद्याचा ठरणार असून, आताचे होत असलेले नुकसान पुढील काळात भरून निघेल, असा आशावादही विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

डिलर्सच्या मते 10 टक्के फटका, प्रत्यक्षात...

जीएसटी दरात करण्यात आलेल्या फेरबदलाचा नव्या कारप्रमाणेच जुन्या कारच्या किमतीत देखील 10 टक्के घट झाल्याचा दावा डिलर्सकडून केला जात आहे. प्रत्यक्षात हा फटका मोठा आहे. कारण पाच लाखांची जुनी कार 50 हजारांनी नव्हे, तर 70 ते 90 हजारांपर्यंत स्वस्त झाली आहे. जुनी कार खरेदी करताना ग्राहकांकडून मुख्यत्वे ‘कारचे ओनर, पासिंग, इंजिन कंडिशन, इंटेरियर, टायर कंडिशन तसेच किती वर्षे जुनी आहे’ याचा विचार केला जातो. त्यावरून कारची किंमत निश्चित होत असते. आता ग्राहकांकडून जीएसटी कमी झाल्याचा देखील निकष लावला जात असून आवर्जुन किंमत कमी करण्याची मागणी केली जात आहे. त्‍यमुळे डिलर्स हा मोठा फटका सोसावा लागत असल्‍याचे चित्र आहे.

जीएसटी दरातील बदलामुळे जुन्या कारच्या किमती 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. जीएसटीचे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने, त्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. जीएसटी दरातील बदलाचे आम्ही स्वागत करतो. कारण पुढच्या काळात याचा आम्हालाही मोठा फायदा होणार आहे.
- कपिल नारंग, संचालक कार माॅल
2022-23 च्या गाड्या घेताना कोणत्या दराने घ्याव्यात याबाबत गोंधळ झाला आहे. कारण ग्राहक कार घेताना जीएसटीतील बदलाचा विचार करीत असून, जुन्या आणि नव्या कारच्या किमतींच्या गणिताचा विचार करीत आहेत. नव्या बदलामुळे जुनी आणि नवी कार एकाच किमतीत पडत असल्याने, जुनी कार विकणे अवघड होत आहे.
- सचिन काठे, जुनी कारविक्रेता
बजेट नसल्याने, जुनी कार खरेदीचा विचार करीत होतो. मात्र, जीएसटीचे दर कमी झाल्याने नव्या कारच्या किमतीदेखील एक ते दीड लाखाने कमी झाल्याने नवी कार खरेदीचादेखील विचार मनात येत आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर कार खरेदी करणार आहे. यामुळे अनेक ग्राहकांना त्याचा फायदा घेता येणार आहे.
-सिद्धार्थ तायडे ग्राहक
जीएसटीचे दर कमी झाल्याने, जुन्या कारचेदेखील दर कमी झाल्याचा आनंद आहे. त्यामुळे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दिवाळी-दसर्‍याच्या मुहूर्तावर जुनी कार खरेदी करण्याचा मानस आहे. जीएसटी दर कमी झाल्यामुळे ज्या ग्राहकांना कार घेण्याचे स्वप्न वाटत होते, त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
- मुग्धा जोशी ग्राहक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT