Nashik Schoolgirl Assault Video Pudhari
नाशिक

Nashik Schoolgirl Assault: नाशिकमध्ये चार बोरांसाठी चिमुरडीला बेदम मारहाण; निर्दयी कृत्याचा VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Nashik Schoolgirl Assault Video: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे बोरं तोडल्याच्या कारणावरून एका शाळकरी मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Rahul Shelke

Nashik Schoolgirl Assault Video: शेतातील बोरं तोडल्याच्या कारणावरून एका शाळकरी मुलीला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजंग-मालेगाव रस्त्यावरील काष्टी येथे तीन शाळकरी मुली शाळेत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत उभ्या होत्या. याचदरम्यान त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील बोराच्या झाडावर बोरं दिसली. त्यामुळे मुलींनी झाडावरील चार-पाच बोरं तोडली. मात्र, हा प्रकार शेतमालकाच्या लक्षात येताच तो घटनास्थळी आला.

बोरं तोडल्याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने एका मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने मुलीच्या कानशिलात जोरात मारल्याने ती थेट जवळच असलेल्या खड्ड्यात पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले.

नागरिकांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नागरिकांशीही हुज्जत घातली. 'काय करायचे ते करून घ्या,' अशा प्रकारची अरेरावीची भाषा केल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवघी चार-पाच बोरं तोडल्याच्या कारणावरून शाळकरी मुलीला अशा प्रकारे मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, घटनेची माहिती समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

किरकोळ कारणावरून एका चिमुरडीला मारहाण झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT