Sayaji Shinde Tree Cutting For Kumbh Mela Nashik:
प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदेचं वृक्षप्रेम सर्वांना माहिती आहे. सयाची शिंदेंनी आपल्या समाजसेवी प्रवृत्तीनं अन् झांडांवरील प्रेमापोटी अनेक झाडं लावली आहेत ती जगवली आहेत. त्यांनी सह्याद्री देवराई या आपल्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली.
सयाजी शिंदे कुठं वृक्षतोड सुरु असेल तर तिथं पोहचून ती थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. असेच त्यांनी पुण्यातील एक शंभर वर्षे जुनं झाड साताऱ्याला नेऊन ते पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला होता. सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या महायुतीचा घटक आहे आणि सत्तेत आहे.
दरम्यान, नाशिकमधील कुंभ मेळाव्यासाठी तपोवन येथील काही झाडं तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांना कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी असल्याचं म्हणत सत्तेत असलेल्या आपल्याच सरकारचे कान उपटले आहेत.
सयाजी शिंदे म्हणतात, '१०० जणांचे बलिदान देऊ मात्र नाशिकमधील एकही झाड तोडू देणार नाही. माणसं पेटून उठतील. मी फक्त निमित्त असेन. तपोवन येथील कुंभमेळ्यासाठी झाडे जोडणे दुर्दैवी आहे. खूप विरोध करावा लागेल. झाड तोडून दहा झाडे लावू हे विधान फालतू आहे. सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. खरं तर माझ्या तोंडात शिव्या येत आहेत. माझ्या डोळ्यादेखत मुलं मारावी तशी झाडं तोडली जात आहेत. हे आपण वाचवलच पाहिजे.'
सयाजी शिंदे यांनी हे वक्तव्य नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधिंना प्रतिक्रिया देताना केलं.
दरम्यान, सयाजी शिंदे यांनी आपण सध्या तिथं जात नसल्याचं सांगतं मनिष बाविसकर, मनोज साठे, शेखर गायकवाड आहेत आमची माणसं आहेत त्यांना मी सांगितलं आहे असं म्हणाले. तुम्ही जर एक झाड तोडत असाल तर आम्ही आमची १०० माणसं तिथं लावू असं देखील ते म्हणाले.
तत्पूर्वी, कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनासाठी शासनानं मान्यता दिली आहे. हा रस्ता ६६.१५ किलोमीटरचा आहे. रिंग रोड भूसंपादनासाठी ३ हजार ६५९ कोटी रूपयांची मान्यता मिळाली आहे. कुंभमेळ्याला नाशिकमध्ये जवळपास २ कोटी भाविक येण्याची शक्यता शासनाने वर्तवली आहे.