

नाशिक / निफाड : तालुक्यात थंडीने मुक्काम ठोकला असून, यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. गहू संशोधन केंद्रात मंगळवारी (दि.18) सकाळी ६.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकला किमान 9.2 तर कमाल 26.9 इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिकसह निफाड तालुक्यात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. थंडीचा कडाका अचानक वाढल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. गारठलेल्या वातावरणामुळे सकाळच्या सत्रात बाजारपेठा, बसस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणे विरळ दिसत होती. दिवसा वाहणाऱ्या गार वाऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत. ही थंडी रब्बी गहू, हरभरा, कांदा पिकांच्या वाढीसाठी पोषक असली, तरी द्राक्ष बागायतदारांना मात्र या थंडीचा फटका बसण्याची भीती आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर असाच कायम राहण्याची आणि तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.