Mobile Addiction Children  
नाशिक

Mobile Addiction Children | मोबाईलच्या विळख्यातून बालपण सोडवा

Mobile Addiction Children |बालदिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन; बालारोग्य जपण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

डिजिटल युगात मोबाईल, ऑनलाइन गेम्स आणि वाढता स्क्रीन टाईम यामुळे मुलांचे मैदानी खेळ कमी होत असून, त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. बदलत्या जीवनशैलीत बालकांचे आरोग्य, पोषण आणि भावनिक सुरक्षितता जपण्याची जबाबदारी पालकांसह समाजातील प्रत्येक घटकाची आहे.

निरोगी बालपणातून सशक्त राष्ट्राची निर्मिती होत असल्याने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सजग राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने बालदिनानिमित्त केले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालआरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालदिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि त्यांना सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी बालकांशी संवाद साधून त्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी सांगितले की, बालकांना औषधोपचारांबरोबरच प्रेम, आपुलकी आणि मानसिक आधाराचीही गरज असते. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून मुलांना मैदानी खेळ, सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीची सवय लावावी. प्रत्येक बालक निरोगी, आनंदी आणि सुरक्षित राहण्यासाठी पालक, आरोग्य यंत्रणा आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत.

लसीकरण, पोषण आणि नियमित तपासणी महत्त्वाची बालकांच्या सुदृढ वाढीसाठी संतुलित व पोषक आहार, पुरेशी झोप, वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित मैदानी खेळ आवश्यक आहेत. शासनाच्या नियमित लसीकरण कार्यक्रममानुसार सर्व लसी वेळेत देणे, बालकांचे वजन व उंची तपासणे तसेच आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य, भावनिक सुरक्षितता आणि आत्मविश्वास जपण्याकडेही पालकांनी लक्ष द्यावे. जिल्हा आरोग्यमार्फत नियमित लसीकरण, माता-बाल आरोग्यसेवा, पोषणविषयक जनजागृती, शालेय आरोग्य तपासणी आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांना आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहेत.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ. विठ्ठल काळे, डॉ. अविनाश गोरे, डॉ. अतुल काळे, सहसेविका अनिता भालेराव, सहायक सहसेविका शुभांगी वाघ, परिचारिका ज्योती तांदुलकर, सीमा पगार यांच्यासह आरोग्य कर्मचारी, बालरुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT