Satpur Trimbakeshwar Road  (Pudhari File Photo)
नाशिक

Satpur Trimbakeshwar Road | पिंपळगाव बहुलात मोरी खचली; सातपूर-त्र्यंबकेश्वर मार्ग ठप्प

Satpur Trimbakeshwar Road | अतिवृष्टीमुळे रस्त्याला मोठे भगदाड; प्रशासनाचा हाय अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पिंपळगाव बहुला गावाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीला बसला. या ठिकाणी पुराच्या पाण्याने रस्ता अचानक खचल्याने सुमारे २० फूट खोल खड्डा पडला. त्यामुळे सातपूर-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक तातडीने दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आली.

वेळेवर वाहतूक थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली. बुधवारी सकाळी सातपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मोरीखालून मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू होता. पाण्याच्या दाबामुळे रस्त्याचा पाया खचून काही भाग कोसळला. ही बाब लक्षात येताच पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला.

रस्ता बंद करण्यात आल्याने पिंपळगाव बहुला ते समृद्धीनगर या दरम्यान दोन्ही बाजूंना दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कार्यालयीन वेळ असल्याने कामानिमित्त जाणारे नागरिक, शालेय वाहने, मालवाहू वाहने तसेच त्र्यंबकेश्वरला जाणारे भाविकांना रोखण्यात आले.

दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर मोरी परिसरातील पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती करून मार्ग सुरक्षित करण्याचे काम हाती घेतले. प्राथमिक दुरुस्तीनंतर काही वाहनांसाठी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT