

वारणानगर : संततधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या वारणा नदीवरील मांगले–सावर्डे बंधाऱ्याचे बर्गे वेळेत न काढल्याने पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा मोठा फटका बसला आहे. पाण्याच्या वाढत्या प्रचंड दाबामुळे बंधाऱ्यालगतचा मुख्य संपर्क रस्ता वाहून गेला असून, परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे. नियम व परंपरेनुसार दरवर्षी १ ते ७ जून दरम्यान कोल्हापूर पद्धतीच्या (के.टी.) बंधाऱ्यांचे बर्गे काढले जातात. मात्र, यंदा जून महिना कोरडा गेल्याने आणि शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र गरज असल्याने पाटबंधारे विभागाने बर्गे काढणे लांबणीवर टाकले होते.
१ जुलैपासून पावसाने अचानक जोर धरताच बंधाऱ्याच्या मागील बाजूस पाणी वेगाने तुंबण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून मांगले–सावर्डे बंधाऱ्यावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत होते. अखेर सोमवारी दुपारी पाण्याच्या प्रचंड दाबामुळे मांगले बाजूचा जोड रस्ता (साईड रस्ता) खचून पूर्णपणे वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसराचा संपर्क तुटला आहे. या पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या पाठीमागील शेतातील गवत, हत्ती गवत आणि कडवळ यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
"नदीला पूर येण्यापूर्वीच जर प्रशासनाने वेळेत बर्गे काढले असते, तर आज रस्ता वाहून गेला नसता आणि शेतीचे नुकसानही टळले असते. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे," असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, 'दै. पुढारी'ने सोमवारीच बर्गे न काढल्याने बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि वाहून गेलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे.