वणी : वणी नाशिक रस्त्यावरील कृष्णगांव येथे असलेले गतिरोधक न दिसल्याने सप्तशृंगी गडावर दर्शन घेवून परतणाऱ्या टाटा पंच कारने शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक दिल्याने ट्रॉली पलटी होवून ट्रॉलीत बसलेले दहा शेत मजुर महिला, कारमधील ३ महिला भाविकांसह १४ जण जखमी झाले आहे.
कृष्णगांव ता. येथील शेतमजुर महिला ह्या ओझरखेड, ता. दिंडोरी येथे शेतीकामास गेल्या होत्या, त्या सांयकाळी सहा वाजता शेतीकामे आटोपून कृष्णगांव येथे मिनी टॅक्टर ट्रॉलीत बसून घरी परत होते. याचवेळी कृष्णगांव गावात ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावरुन गावात वळण घेत असतांना सप्तशृंगी गडावरुन दर्शन घेवून परतणारी मुरबाड, जि. ठाणे येथील टाटा पंच कारच्या चालकाला रस्त्यावरील गतिरोधक न दिसल्याने वाहन गतिरोधकावर आढळून वाहनचालकाचे संतुलन गेल्याने वळन घेत असलेल्या टॅक्टर ट्रॉलीस धडक दिली.
यात ट्रॅक्टर व ट्रॉली वेगळी होवून ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीत बसलेल्या अश्विनी रामराव गायकवाड वय 40, रेखा पुंडलिक गांगुर्डे वय 42, कविता दीपक गायकवाड वय 35, छाया भगवान गायकवाड वय 38, मंगला मंगळू बोरस्ते वय 43, सुरेखा जाधव वय 53, सोनाली घोरपडे वय ३२, सरला संतोष गायकवाड वय 50, संगीता अशोक डंबाळे वय 48, छबाबाई दत्तू वाघ वय ६० सर्व रा. कृष्णगांव, ता. दिंडोरी, मालती विशाल भुसारे वय 35 रा. अहिवंतवाडी तसेच कारमधील रुचिता इंदु राव वय २०, मनीषा हिंदू राव वय ४६, राजेंद्र हिंदू राव वय ६० मुरबाड, जि. ठाणे ह्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कृष्णगांव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमींना रुग्णवाहिका, व खाजगी वाहनाने वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. याबाबत रात्री उशिरा वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
वणी ग्रामीण रुग्णालयात टीटीचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कर्तव्यावर उपस्थित असलेल्यांनी सांगितल्याने कृष्णगाव व वणी ग्रामस्थांनी संतप्त होत, रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी काही स्थानिक ग्रामस्थांनी संतप्त ग्रामस्थांना शांत केले.
वणी ग्रामीण रुग्णालय हे परीसरातील सात ते सत्तर गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु रुग्णालयात औषधांची नेहमी टंचाई असते. अपघातात जखमींना देण्यासाठी टीटी इंजेक्शन उपलब्ध नसणे हे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. झिरवाळ यांच्या मतदार संघातील मुख्य गावाचे दुर्भाग्य असल्याचे ग्रामस्थांना वाटते.राजेंद्र महाले, पोलिस पाटील कृष्णगांव
रुग्णालयात टीटी इंजेक्शनसह नसलेल्या औषधांची मागणी केलेली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून टीटी इंजेक्शन खाजगीरीत्या विकत घेवून रुग्णालयात पुरेसा स्टॉक उपलब्ध करुन दिला आहे. मात्र शहानिशा न करता रुग्णाच्या नातेवाईकांना कोणी इंजेक्शन नसल्याचे कोणी बेजबाबदारपणे सांगितले असेल तर याची चौकशी करण्यात येईल.डॉ. सोनल गायधणी, प्रभारी वैद्यकिय अधिक्षिका