नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. शहरातील खड्यांमुळे आतापर्यंत सात जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगत, 'साधे रस्त्यांवरील खड्डे बुजविता आले नाहीत आणि कुंभमेळा घेण्याची तयारी सुरू आहे,' अशा शब्दांत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना 'चंपतराय कुंभमंत्री' म्हणत टीका केली.
महापालिकेच्या कारभाराविरोधात तसेच शहरातील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे सोमवारी (दि. १७) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी राऊत रविवारी (दि. १६) नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला. खा. राऊत म्हणाले, नाशिकमधील खड्यांची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे काही महिने उरले असताना शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे.
खड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असून, अनेक जण जखमी होत आहेत. तरीही सरकार आणि प्रशासन या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ काही लहान मुलांनी तयार केले. या व्हिडिओमधून त्यांनी शहरातील रस्त्यांची परिस्थिती सरकारसमोर आणली. 'आता लहान मुलांनाही या सरकारची खिल्ली उडवावी लागत आहे,' अशी टीका राऊत यांनी केली. आदित्य ठाकरे यांनीही संबंधित ठिकाणी भेट दिल असून, तेथे शंभरहून अधिक नागरिक जखम झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आज जनआक्रोश मोर्चा
सोमवारी नाशिक महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चातून सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला. कुंभमेळ्याच्या नावाखाली विकासाऐवजी केवळ लूट सुरू आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी नाशिककरांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असताना शहरातील मूलभूत रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा मुद्दा शिवसेनेच्या या मोर्चातून आक्रमकपणे मांडला जाणार आहे.
दत्तक घेतले, मग शहराची दुरवस्था का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारला सवाल केला. 'नाशिकला दत्तक घेतले, मग शहराची अशी दुरवस्था का ? दत्तक पित्याने नाशिकसाठी काय केले?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रस्ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. नाशिकमधील रस्त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.