नाशिक / मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या बजेटपैकी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. २९) मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केला.
कुंभमेळामंत्री आणि संबंधित अधिकारी मिळून हा पैसा उडवणार असून, त्याची सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर आणि त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येते, असा दावा राऊत यांनी केला. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे गांभीर्याने पाहणे सोडले असल्याची टीकाही त्यांनी केली. राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच बोलत नाहीत, तर साधू-संतही आता उघड बोलत आहेत.
कुंभमेळ्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातील किमान २५ हजार कोटी रुपये कुंभमेळामंत्री आणि त्यांचे अधिकारी उडवणार आहेत. याची सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करताना राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानाच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केला. जे मुख्यमंत्री राम मंदिरातील दानचोरीवर बोलत नाहीत, त्यांना कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा घनाघात त्यांनी केला.
नाशिकमधील विकासकामांमध्ये कोणतेही नियोजन नसल्याचा आरोप करत राऊत यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून सरकारला बारेवर धरले. सरकारला नाशिकमधील खड्डे दिसत नाहीत का? या खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू दिसत नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या सरकारची अवस्था महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखी झाली आहे. गांधीजींची माकडे नीतिमत्तेची होती; मात्र या सरकारची माकडे वेगळी आहेत. त्यांना भ्रष्टाचार दिसत नाही, ते भ्रष्टाचारावर बोलत नाहीत आणि भ्रष्टाचार पाहातही नाहीत, असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० वर्षांपूर्वी नाशिक शहराला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर शहराची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली असल्याची टीका राऊत यांनी केली. १० वर्षांपूर्वी नाशिकला दत्तक घेतल्याचे फडणवीस विसरले आहेत. शहराची दुर्दशा झाली आहे. विकासकामांच्या नावाखाली नियोजनशून्य पद्धतीने कामे सुरू आहेत. केवळ टेंडर काढणे आणि कंत्राटदारांना कामे देणे एवढेच सरकारचे काम राहिले आहे. त्यामुळे नाशिककरांचे हाल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.