नाशिक : आरोग्य प्रणाली अधिक सक्षम होण्यासाठी संशोधनावर मंथन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या माजी मुख्यसचिव सुजाता सौनिक यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टोकोमी फेलो यांच्या संयुक्त विद्यमाने 'संगम-2025' आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभास आयआयटी मुंबईचे प्रा. सार्थक गौरव, कुलगुरु माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील उपस्थित होते. यावेळी सौनिक म्हणाल्या की, 'संगम-२०२५' च्या माध्यमातून विविध आरोग्य, संशोधन व तंत्रज्ञान विषयावर होणारे चर्चासत्रातून 'ब्लु-प्रिंट' तयार करुन ती शासनाकडे सादर करण्यात येईल. जेणेकरुन आरोग्य विषयक योजनांच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याचा मोठया प्रमाणात उपयोग होईल.
प्रास्ताविकात कुलगुरु कानिटकर यांनी, विद्यापीठाने डिजिटल हेल्थ प्रोग्रामव्दारा अभ्यासक्रम सुरु केले असून त्याचा सकारात्मक उपयोग होईल. यासाठी विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पालवे यांनी केले. परिषदेला विविध देशातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, संशोधक, अभ्यागत, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रा सार्थक गौरव यांनी आरोग्य व तंत्रज्ञान यांचा वापर करुन सामाजिक आरोग्यासाठी कार्य करणे शक्य आहे. यासाठी संगमच्या माध्यमातून आरोग्य विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.