Water  Pudhari
नाशिक

Lasalgaon Water Issues | 'एक महिन्यात युद्धपातळीवर काम पूर्ण करा' : समीर भुजबळ

Lasalgaon Water Issues | लासलगावसह १६ गावांच्या पाणीप्रश्नावर खासदारांची तातडीची बैठक; अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

"काहीही करा, पण पुढील एक महिन्यात युद्धपातळीवर काम करून ही योजना सुरळीत सुरू करा," असे स्पष्ट आदेश समीर भुजबळ यांनी दिले. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामांबाबत रविवारी (दि.१४) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.

खासदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत योजनेतील विलंब, विविध तांत्रिक अडचणी आणि संबंधित विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. कामातील दिरंगाईबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लासलगाव ते सोळगाव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न गंभीर बनला असून बाधित गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने प्रशासनाने प्राधान्याने काम पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. योजनेतील अडचणी, एमजीपीकडून होत असलेला विलंब, सोलर प्लांट उभारणीची प्रगती, तसेच लासलगाव-विंचूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या पाइपलाइनच्या जागी नवीन पाइप टाकण्याच्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

बाधित गावांतील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. योजनेच्या कामांचा पुढील सविस्तर आढावा घेण्यासाठी सोमवार (दि. १५) नाशिक येथे पुन्हा बैठक बोलाविण्यात आली असून संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मी उपअभियंता असूनही अधिकृत वाहन उपलब्ध नसल्याने आजच्या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागला. तथापि, नागरिकांच्या पाणीप्रश्नाची जाणीव ठेवून उपलब्ध संसाधनांमध्ये कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबित कामांना अधिक वेग देण्यात येईल. श्रद्धा मोरे (उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक)

संबंधित विभाग, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून प्रलंबित अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील एक महिन्यात युद्धपातळीवर काम पूर्ण करून योजना सुरळीत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून, लाभार्थी गावांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
- दिलीप खैरे, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT