पंचवटी (नाशिक) : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचे सोमवारी (दि.४) सायंकाळी 6 वाजता इंदिरानगर येथील 'हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रीडा मैदान' राणेनगर - राजीवनगर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सभास्थळी भिडे यांना 'विद्रोही संत तुकाराम' हे पुस्तक भेट देण्याच्या प्रयत्नात असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी सकाळी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून संभाजी भिडे यांचे 'भारतीय स्वतंत्र्य आणि आपण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. भिडे यांचे वक्तव्य म्हणजे तुकाराम महाराज यांचा अपमान आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी वारीला संरक्षण दिले होते. आम्ही पानसरे, दाभोळकर, गौरी लंके यांच्या विचारांचे लोक आहे. विचारांना विचाराने उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गाने भिडे गुरुजी यांना अ. हा. साळुंखे लिखित 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक भेट देणार होतो. भिडेंना तुकाराम महाराज समजावे, हा उद्देश होता. मात्र इंदिरानगर, पंचवटी पोलिसांनी आम्हाला तीन दिवसांपासून नजरकैदेत ठेवल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले. पंचवटी पोलिसांनी वाघ यांच्यासह विक्रम गायधनी, नितीन काळे, प्रेम भालेराव, लकी बावस्कर, मंदार धिवरे, राकेश जगताप, नीलेश गायकवाड, संविधान गायकवाड, हिरामण वाघ यांना ताब्यात घेतले आहे.