Salher Fort  
नाशिक

Salher Fort | ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याचे निसर्ग परिचय केंद्र भग्नावस्थेत; वनविभागाचे दुर्लक्ष

Salher Fort | जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वनविभागाने उभारलेले निसर्ग परिचय केंद्र देखभाल-दुरुस्तीअभावी भग्नावस्थेत आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

सटाणा : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वनविभागाने उभारलेले निसर्ग परिचय केंद्र देखभाल-दुरुस्तीअभावी भग्नावस्थेत आले आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या केंद्रातील वनप्राण्यांची शिल्पे तुटली असून, इमारतीचे दरवाजे आणि खोल्यांचीही दुरवस्था झाली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वापूर्ण असलेली ही वास्तू अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.

सन २०१५ मध्ये तत्कालीन उपविभागीय वनाधिकारी सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्ग परिचय केंद्र आणि अतिथीगृहाची उभारणी करण्यात आली होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांतील वन्यप्राणी, जैवविविधता आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याची माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता. केंद्रात वनप्राण्यांची आकर्षक शिल्पे, माहितीपट, डिजिटल फ्रेम्स आणि माहिती फलकांची मांडणी करण्यात आली होती.

त्यामुळे किल्ल्याला भेट देणारे पर्यटक या केंद्रालाही आवर्जून भेट देत असत. विशेषतः लहान मुलांसाठी वन्यप्राण्यांची शिल्पे आकर्षणाचे केंद्र ठरली होती. मात्र, कालांतराने देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या केंद्राची रयाच गेली आहे.

सध्या केंद्रातील अनेक शिल्पे तुटलेल्या अवस्थेत असून, ती एका खोलीत ठेवण्यात आली आहेत. इमारतीच्या अनेक खोल्यांची दुरवस्था झाली असून, दरवाजेही तुटलेले आहेत. खोल्या उघड्या आणि असुरक्षित असल्याने त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी इमारतीची दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

निसर्ग परिचय केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा!

ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या शिवसृष्टी विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर किल्ल्याचा इतिहास आणि परिसरातील समृद्ध वनसंपदेची माहिती देणाऱ्या निसर्ग परिचय केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठीही वनविभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, शिल्पांची पुनर्रस्थापना आणि नियमित देखभालीची व्यवस्था केल्यास या केंद्राला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते. त्यातून साल्हेर परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

"यापूर्वी या केंद्राच्या दुरुस्तीसाठी कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता किंवा तशी मागणीही करण्यात आली नव्हती. आता केंद्राच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येत असून, तो मंजूर होण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल."
— ज्ञानेश्वर शर्माळे, वन परिक्षेत्र अधिकारी, ताहाराबाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT