नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण व पूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २९) दुपार रामकुंड परिसराची संयुक्त पाहणी केली. सिंहस्थाच्या विकासकामांची संथगती आणि साधुग्राम उभारणीबाबत अद्याप ठोस नियोजन दिसत नसल्याने साधू-महंतांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रपतींचा दौरा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रामकुंड परिसरातील सुरक्षा व्यवस्था, ये-जा करण्याचे मार्ग, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी करताना साधू-महंतांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.
पाहणी दौऱ्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्त महंत संजयदास महाराज, निर्वाणी अणी आखाड्याचे श्रीमहंत मुरलीदास महाराज, महासचिव महंत सत्यदेवदास महाराज, महंत नंदरामदास महाराज,
महंत डॉ. महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत हेमंतदास महाराज आणि महंत माधवदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही साधू-महंतांची रामकुंडावर भेट घेत चर्चा केली.
ध्वजारोहण तयारी पाहणीदरम्यान पुरोहित संघ प्रतिनिधी व रामतीर्थ समिती पदाधिकाऱ्यांत शाब्दिक चमकम झाल्याचे वृत्त आहे. या वादामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, गोदाआरतीच्या आयोजनावरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समितीमध्ये यापूर्वी निर्माण झालेल्या मतभेदांची पार्श्वभूमी या घटनेला असल्याची चर्चा रामकुंड परिसरात सुरू होती.