Rupali Chakankar Inquiry  pudhari photo
नाशिक

Rupali Chakankar SIT Inquiry | नाशिकमध्ये रूपाली चाकणकरांची 6 तास चौकशी! भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीचा ससेमिरा

Rupali Chakankar SIT Inquiry | अखेर एसआयटीसमोर हजर, पोलिस अकादमीत प्रश्नांच्या फैरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची रविवारी विशेष तपास पथकाने तब्बल सहा तास चौकशी केली, खरातशी संबंधित असलेल्या संस्थांमध्ये सहभाग व महिला आयोग अध्यक्षपदी असताना खरातशी संबंधित तक्रारींमध्ये पोलिस तपासात केलेला हस्तक्षेप या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसहापर्यंत महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एसआयटी कार्यालयात ही चौकशी पार पडली. एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते व उपविभागीय अधिकारी किरणकुमार यांच्या सूर्यवंशी उपस्थितीत पथकाने चाकणकर यांना विविध प्रश्न विचारले. चौकशीदरम्यान चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दाखल रूपाली चाकणकर रविवारी सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या होत्या.

यावेळी त्यांनी वाटेत तीन ते चार वेळा वाहन थांबविल्याची तसेच गाडी बदलल्याची माहिती समोर आली. नाशिकमध्ये झाल्यानंतर त्यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत रवींद्र पवार यांच्या बडदेनगर येथील निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, "मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार आहे," असे त्यांनी सांगितले. यानंतर त्या दुपारी महाराष्ट्र पोलिस अकादमीत दाखल झाल्या.

अशोक खरात प्रकरणाशी संबंधित संबंध, श्री शिवनिका संस्थेतील भूमिका तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या काळातील काही निर्णयांबाबत एसआयटीने त्यांची सविस्तर चौकशी केल्याचे समजते. अशोक खरातच्या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य राहिल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

तसेच अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अहिल्यानगरमध्ये खरातशी संबंधित असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिस यंत्रणेच्या तपासामध्ये हस्तक्षेप करणे तसेच महिला आयोगाच्या पदाच्या माध्यमातून खरातला मदत करणे, यासंदर्भात त्यांच्यावर आरोप झालेले आहेत.

पुढील आठवड्यात दोषारोपपत्र

दरम्यान, अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार व फसवणुकीच्या एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये एसआयटीकडून पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT