Rupali Chakankar absent SIT Inquiry  pudhari photo
नाशिक

Rupali Chakankar SIT Inquiry | रूपाली चाकणकर 'एसआयटी' समोर गैरहजर

- चाकणकरांवर संशयाचे सावट अधिक गडद

पुढारी वृत्तसेवा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दिलेल्या वेळेत चाकणकर चौकशी समितीसमोर हजर झाल्या नाहीत. या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Rupali Chakankar absent SIT Inquiry

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महिला माजी आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्याचे टाळल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस मिळूनही नाशिकला प्रवास करून येणे शक्य नाही, असे कारण देत त्यांनी गैरहजेरी लावल्याने या प्रकरणात संशय अधिक गडद झाला आहे.

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्यातील संबंधांबाबत आधीपासूनच चर्चा सुरू होती. तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे मिरगाव येथील 'शिवनिका' ट्रस्टमध्ये चाकणकर या विश्वस्त असल्याची बाब समोर आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरात दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेवर दबाव टाकल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले होते. त्या काळात त्यांनी आपल्या संवैधानिक पदाचा वापर करून काही प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. मात्र, नंतर नाशिकमध्ये अशोक खरातविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर या सर्व संबंधांची उकल होऊ लागली.

या पार्श्वभूमीवर वाढत्या दबावामुळे रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता एसआयटीसमोर हजर राहण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, तपास यंत्रणा पुढील कायदेशीर पावले उचलण्याच्या तयारीत असून, आवश्यक असल्यास पुन्हा समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. चाकणकर या आणखी किती काळ चौकशीपासून दूर राहतात आणि पुढील भूमिका काय घेतात, याकडे संपूर्ण प्रकरणात लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT