Dwarka Nashik road 
नाशिक

Dwarka Nashik road | द्वारका-नाशिक रोड रस्ता रुंदीकरणासाठी २२० कोटी

द्वारका-नाशिकरोड रस्ता रुंदीकरणासाठी २२० कोटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : द्वारका ते नाशिकरोड दहा पदरी रस्ता रुंदीकरणासाठी २२० कोटींच्या खर्चाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ने अंतिम मंजुरी दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर न्हाईने या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे या महिना अखेरीस रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे नाशिकरोड ते नाशिक वाहतूक वेगवान बनणार आहे.

शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण चौक असलेल्या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंडरपास तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. द्वारका ते नाशिकरोड हा रस्ताही वाहतूक कोंडीने ग्रस्त आहे. नाशिक-पुणे महामार्गाचा हा भाग असल्याने या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी चार वर्षांपूर्वी 'भारतमाला' योजनेंतर्गत द्वारका ते दत्तमंदिर डबलडेकर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता. परंतु, निओ मेट्रो प्रकल्प थंड बस्त्यात गेल्याने पुलाचा प्रस्तावही गुंडाळला गेला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता द्वारका ते नाशिकरोड रस्ता दहा पदरी करण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी न्हाईकडे सादर केला होता. या प्रस्तावावर शुक्रवारी (दि.८) दिल्लीत झालेल्या वाहतूक व दळणवळण मंत्रालयात मनपा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला मनपा आयुक्त मनीषा खत्री या उपस्थित होत्या.

मार्च २०२७ पर्यंत कामाची मुदत द्वारका सर्कल ते दत्तमंदिर या मार्गाच्या रुंदीकरणासाठी मनपाने १७ मार्च रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आता न्हाईने अंतिम मंजुरी दिल्याने मनपाने मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. निविदा प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT