आमदार रोहित पवार File Photo
नाशिक

Rohit Pawar | 'ठासून सांगा नाहीतर समृद्धी महामार्ग रोखणार!' आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला थेट इशारा

Rohit Pawar | आमदार रोहित पवारांनी दुष्काळ, एमपीएससी आणि कायदा-सुव्यवस्थेवरून डागली तोफ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

"सरकारने घाईगडबडीत दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळालेली नाही. येत्या कॅबिनेटमध्ये ठोस निर्णय झाला नाही, तर 'समृद्धी महामार्ग' रोखून धरू," असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

आ. पवार यांनी बुधवारी (दि. ३०) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझा दुष्काळ दौरा सुरू असून, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात जाऊन शेतकरी व पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासूनची कोणतीही माहिती न घेता अर्धवट माहितीआधारे घाईगडबडीत दुष्काळ जाहीर केला.

सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात गोंधळ घातल्यामुळे आणि विरोधकांचा दबाव वाढल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. पण सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर का केला नाही? शेतकरी आणि मजुरांना प्रत्यक्षात मदत कधी मिळणार? मदत किती आणि कधी होणार, याचे उत्तर सरकारने पुढील आठवड्यात दिलेच पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी यावेळी केली.
गेल्या वर्षीही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्यामुळे १ लाख रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. सरकारने किमान २५ हजार कुटुंबांना तत्काळ मदत दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ केले पाहिजे. सरकार १३ हजार कोटी रुपये देणार असल्याचे ऐकण्यात आले आहे, पण कर्जमाफीची रक्कम आणि प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.

शक्तिपीठ महामार्गाचा निधी वळवून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरा. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी हिताचा योग्य निर्णय न झाल्यास थेट समृद्धी महामार्ग रोखून धरू, असे पवार यांनी सांगितले. कुंभमेळ्याची माहिती समोर आली आहे. देवाच्या नावाखाली या सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

एमपीएससी आंदोलनावर ठाम!

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठे आंदोलन होणार आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी यासाठी नोटीस बजावली असली तरी विद्यार्थी आपल्या हक्कांवर ठाम आहेत.

एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांना तत्काळ पदावरून हटवून मुंढे किंवा गेडाम यांच्यासारख्या कडक आणि पारदर्शक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे. व्ही. राधा समिती केवळ विधाने करत आहे, पण रिपोर्ट कधी देणार हे सांगत नाही. शेवटी निर्णय विद्यार्थ्यांचा आहे. आता मुख्यमंत्री विद्यार्थ्यांची बाजू घेतात की आपल्या मित्राची, हे महाराष्ट्राला पाहायचे आहे, असेही पवार म्हणाले.

गृहखात्याचा वचक संपला

ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेवरून आणि राज्यात बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. सत्ताधाऱ्यांना वाटतं की हे राज्य त्यांचेच आहे. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आणि त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा विचार दिला आहे, जो हे सत्ताधारी विसरले आहेत.

अजितदादा सोबत असताना हे चिरकूट लोक गप्प होते, काही करत नव्हते. पण आता थेट बारामतीतही गँगवॉर सुरू झाले आहे. राज्याच्या गृहविभागाचा अजिबात वचक राहिलेला नाही आणि कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT