Accident Pudhari
नाशिक

Mohdari Ghat Truck Accident | मोहदरी घाटात ट्रक उलटला; 30 टन तांदूळ रस्त्यावर

Mohdari Ghat Truck Accident | पुरवठा विभागाकडून चौकशीला वेग; आज करणार अहवाल सादर

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नरजवळील मोहदरी घाटात शनिवारी (दि. २८) पहाटे तांदळाने भरलेला ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अंदाजे ३० टन तांदूळ रस्त्यावर विखुरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रस्त्यावर तांदळाचे कट्टे अस्ताव्यस्त पडल्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली. दिशेने सोलापूरहून अहमदाबादच्या निघालेला हा ट्रक (एमएच १३, सीयू ६०४५) शनिवारी पहाटे ५.३० च्या सुमारास मोहदरी घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे उलटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच सिन्नर पोलिस व तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जर हा तांदूळ रेशनचा असून, तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे निष्पन्न झाले, तर यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरा सुरू होते. पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

तांदूळ रेशनिंगचा असण्याची शक्यता ?

प्रथमदर्शनी हा तांदूळ शासकीय रेशनिंगसाठी असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तो खरोखरच सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ आहे की, खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर सिन्नर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक विवेक जमदाडे यांनी सखोल शहानिशा सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल सोमवारी (दि. ३०) पोलिसांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT