Girish Mahajan News File Photo
नाशिक

Republic Day Nashik | संविधान कायद्याचे पुस्तकच नव्हे, तर देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब

Republic Day Nashik | महाजन : 31 हजार विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभक्तीपर समूहगानातून महापुरुषांना अभिवादन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून, ते देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून उभा आहे. विद्याथ्यांनी हे संविधान फक्त वाचू नये, तर आपल्या विचारांत आणि कृतीत उतरवावे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

झेप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, नाशिक यांच्या वतीने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात तब्बल ८१ शाळांमधील सुमारे ३१ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी प्रास्ताविक केले.

देशभक्तीपर गाण्यातून मुलांच्या मनावर खोल रुजणारा संस्कार होतो हे अशा आयोजनातून सिद्ध होते असे सांगत बग्गा यांनी विद्यार्थी, शिक्षक, संगीत टीमचे कौतुक केले. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे प्रकाशभाई पटेल, गटनेते श्याम बडोदे, सुधाकर बडगुजर, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. सुनील ढिकले, महेश हिरे, सुनील केदार, ज्ञानेश्वर बोडके तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, २६ जानेवारी हा दिवस केवळ एक सण नसून, भारताने 'आपण स्वतःचे शासन स्वतः चालवू' असा संकल्प केलेला ऐतिहासिक दिवस आहे. हजारो विद्याथ्यांनी एकाच सुरात देशभक्तीपर गीत गाताना निर्माण केलेले दृश्य थक्क करणारे होते. जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र 'माझा देश महान आहे' असे गातात, तेव्हा जाती, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन 'आपण भारतीय आहोत' ही एकच ओळख उरते, असेही त्यांनी सांगितले. गेल्या ११ वर्षांपासून कोरोनाचा कालावधी वगळता एकही खंड न पडता हा उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल त्यांनी झेप मंडळाचे कौतुक केले. प्रतिभा धोपावकर यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT