नाशिक

Navratri 2023 : चांदवडची राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता

गणेश सोनवणे

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे (Renuka Mata Mandir) प्राचीन, जागृत व प्रसिध्द देवस्थान नाशिक जिल्हयातील चांदवडला स्वयंभू विराजमान झाले आहे. श्री रेणुका मातेचे हे मंदिर सहयाद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरातील टेकडीच्या गुहेत वसलेले आहे. नाशिक जिल्हयातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिध्द देवस्थान असल्याने भाविकभक्तांची दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची प्रचंड गर्दी असते. जाणून घेऊया या मंदिराची आख्यायिका…

देवीेचे धड माहूर तर शीर चांदवड येथे…

चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गा शेजारील सहयाद्री पर्वताच्या डोंगररांगेत श्री रेणुकामाता स्वयंभू विराजमान झाल्या आहेत. हे देवस्थान साडे तीन खंडपीठापैकी अर्ध्ये पीठ म्हणून ओळखले जाते. श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वताच्या आईचे शीर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. त्यावेळी देवीच्या धडाचा भाग माहूर (ता. किनवट जी. नांदेड) येथे असून शीर चांदवड येथे आहे. त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून प्रसिध्द असलेली जगतजननी, चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते. (Renuka Mata Mandir Chandwad)

नवरात्रीत 10 दिवसांचा यात्रोत्सव…

या ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेले सर्व नवस, आराधना माता पूर्ण करते. या भावनेने संपूर्ण राज्यातून व देशातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात. पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रात १० दिवस व चैत्र पौर्णिमेला एक दिवस या ठिकाणी भव्य यात्रोत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सव काळात हजारो स्त्री, पुरुष मोठ्या श्रद्धेने मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात घटी बसतात. नवरात्रात दुर्गाष्टमिला नवचंडी होमहवन होत असतो. या उत्सव काळात श्री रेणुका मातेच्या शृंगाराची विधिवत सकाळ व सायंकाळच्या वेळी संपूर्ण गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच दर महिन्यास असलेल्या पौर्णिमेला पालखी मिरवणूक काढण्यात येते.

१७३५ ते १७९५ कालावधीत मंदिराचा जीर्णोधार 

ब्रिटीश कालीन सरकारच्या ताब्यात असलेल्या या पुरातन कालीन मंदिराचा जीर्णोधार पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी सन १७३५ ते १७९५ या कालावधीत केला आहे. या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभा मंडप, तीर्थ तलाव, आदीचे बांधकाम केले आहे. श्री अहिल्याबाई होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करीत असत. हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून होत आहे. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहाल मार्फत दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात दहा दिवस पालखी काढण्यात येते. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी लाकडी कोरीव कामात अप्रतिम असा ऐतिहासिक रंगमहाल या वास्तूचे बांधकाम केले आहे. या रंगमहालाला पुरातन रूप देण्यासाठी पुरातत्व विभागामार्फत काम सुरु आहे. मात्र हे काम गेल्या पाच ते सहा वर्षापासून बंद असल्याने रंगमहालाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रंगमहाल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे. यामुळे या महालाचे बंद पडलेल्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देऊन रंगमहाल पर्यटकांसाठी खुला करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (Renuka Mata Mandir Chandwad)

पोर्णिमेला पालखीची पंरपरा…

दरवर्षी नवरात्र उत्सव काळात श्री रेणुका मातेची भव्य अशी यात्रा भरत असल्याने येथे हजारो भाविक भक्त आपल्या आराध्यदैवताच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. या मंदिराच्या उजव्या बाजूला रासलिंग इंद्रायणी किल्ला तर डाव्या बाजूस भगवान शिवशंकराचे चंद्रेश्वर मंदिर आहे. दर पौर्णिमेस रेणुकादेवीची पालखी सकाळी अहिल्यादेवींच्या रंगमहालातून देवीच्या मंदिरात जाते व सायंकाळी मंदिरातून रंगमहालात जाते, या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुहासीनी आपआपल्या घरापुढे मनोभावे पालखीची पूजा करतात. ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. चैत्र पौर्णिमेला एक दिवस व अश्विन शुद्ध प्रतीपदेपासून दशमीपर्यत दहा दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या उत्सव काळात भाविक आपले नवस नारळ, हळदी कुंकू वाहून व जावळ काढून फेडतात. यात्रेच्या काळात फुलांच्या माळा, हार, नारळ यांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावून त्यांची विक्री केली जाते. या यात्रोत्सव काळात पहाटे चार वाजेपासून देवीचा महाभिषेक केला जातो. यावेळी नामवंत कीर्तन प्रवचन करांचा लाभ भाविकांना होत असतो.

भाविकांसाठी सोयी-सुविधा

या जागृत स्वयंभू पुरातन कालीन श्री रेणुका देवी मंदिराचा कारभार अनेक वर्षापासून अहिल्यादेवी होळकर सरकारकडे होता. सध्या मंदिराचा संपूर्ण कारभार ट्रस्टकडे असल्याने मंदिराच्या परिसरात सुशोभितपणा करण्यात आला आहे. हया ट्रस्ट मध्ये भारत सरकारचे प्रतिनिधी असल्याने यावर भारत सरकारचे नियंत्रण आहे. या मंदिराची देखभाल करण्याचे कामकाज ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर के. पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार करीत आहेत. ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार यांनी व्यवस्थापनेच्या कारकिर्दीत मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, विजेचे मोठे लाईट, भाविकांना घटी बसण्यासाठी निवासगृह, दर्शनासाठी बॅरिकेटीग, विद्युत जनरेटर, बटरी इन्व्हर्टर, पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल, लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमासाठी मोठी जागा व स्वयंपाकाची भाडी, विद्युत घंटा, क्लोज सर्किट, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच चांदवडचे विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या निधीतून यात्रा स्थळ विकास निधीतून भक्त निवास, विश्राम गृह, स्त्रियांसाठी प्रसाधन गृह, शिर्डीच्या धरतीप्रमाणे रांगा लावणेसाठी स्टीलचे बॅरिकेटीग, वाहनतळ, संपूर्ण मंदिर परिसरात सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसराला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.

देवस्थानाला "ब' वर्गाचा दर्जा

चांदवडच्या श्री रेणुकामाता मंदिर देवस्थानाला 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भाविक भक्त श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. या मंदिराची देखभाल व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, हरेंद्र वैद्य, तानाजी आहेर, नारायण कुमावत, हरिभाऊ कासव आदी करीत आहे.

मंदिरापर्यंत कसे जाणार?

विमानाने- नाशिक येथून जवळच ओझर विमानतळ आहे. तेथून तुम्ही प्रायव्हेट वाहन किंवा बसने जाऊ शकता.  रस्त्याने – नाशिकपासून चांदवड हे 65 किलोमीटर आहे, प्रायव्हेट वाहन किंवा बसनेही तुम्हाला जाता येईल.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT